Home ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीचे काय करायचे? राज ठाकरे यांच्याकडून कल्याण-भिवंडी लोकसभेचा कानोसा

लोकसभा निवडणुकीचे काय करायचे? राज ठाकरे यांच्याकडून कल्याण-भिवंडी लोकसभेचा कानोसा

कल्याण पश्चिमेत केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा

कल्याण दि.23 जानेवारी :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेनेही आखणी करण्यास सुरुवात केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या भिवंडी आणि कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी आज भिवंडी लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणूक लढवावी का ? लढवायची झाल्यास ती स्वबळावर लढवायची की दुसऱ्या पक्षासोबत आदी मुद्द्यांवर राज ठाकरे (mns chief Raj Thackeray)यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

मनसेही आता लोकसभेच्या या आखाड्यात…
लोकसभा निवडणुक तोंडावर आली असून आगामी काही दिवसांत कोणत्याही क्षणी त्याची आचारसंहिता जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सध्या बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झाले आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत लोकसभा लढवणार नसल्याचे सांगणारी मनसेही आता लोकसभेच्या या आखाड्यात उतरताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमूख पदाधिकारी त्यादृष्टीने पाऊले टाकताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत 29 फेब्रुवारीपर्यंत मांडणार भूमिका…
भिवंडी लोकसभेअंतर्गत येणाऱ्या कल्याण पश्चिममध्ये झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व विधानसभा तसेच बदलापूर येथील शहराध्यक्ष, उप शहराध्यक्ष, शाखाध्यक्ष, उप शाखाध्यक्ष, विभागअध्यक्ष , उपविभागअध्यक्ष आदी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. लोकसभा निवडणूक लढवावी का ? ती स्वबळावर की कोणासोबत लढवायची आदी प्रश्नांचा पदाधिकाऱ्यांच्या मनातील कानोसा घेतला. तसेच येत्या 29 फेब्रुवारी पर्यंत आपापल्या विभागातील पदाधिकाऱ्यांची यादी गोळा करण्याचे सांगत लोकसभा निवडणुकीबाबत आपण तेव्हाच भूमिका स्पष्ट करू असेही या बैठकीत राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव आदी महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान महाराष्ट्रात सध्या असणारी राजकीय परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष लोकसभा निवडणुकीबाबत काय भूमिका घेतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा