Home ठळक बातम्या कल्याण-पडघा मार्गावर गांधारी पुलावरील खड्डे ठरताहेत अपघाताला निमंत्रण

कल्याण-पडघा मार्गावर गांधारी पुलावरील खड्डे ठरताहेत अपघाताला निमंत्रण

 

कल्याण दि. 2 जुलै :
अद्याप पावसाला नीटशी सुरुवातही झाली नसली तरी अनेक महत्त्वाच्या मार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणहून पडघा – नाशिककडे जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गांधारी पुलावरही मोठाले खड्डे पडले असून त्यामूळे लहान लहान अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे.

गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर अधून मधून पडणाऱ्या सरी वगळता पाऊस गायबच झाल्याचे चित्र आहे. मात्र या एव्हढ्याशाच पावसाने शहरातील काही रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणहून नाशिकला जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गांधारी पुलही त्याला अपवाद नाहीये. विशेष म्हणजे आताच्या घडीला या पुलावर मोजकेच खड्डे असले तरी त्यांचे आकारमान पाहता वाहन चालकांसाठी ते चांगलेच धोकादायक ठरत आहेत.

कल्याण -पडघा मार्गावर दररोज हजारो गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामध्ये दैनंदिन कामासाठी बाईकवर ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. परिणामी अधिकाधिक बाईकस्वार या खड्ड्याच्या कचाट्यात सापडत असल्याचे दिसत आहे. त्यात या पुलावर कोणत्याही प्रकारचे पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी तर हा उड्डाणपूल आणखीनच धोकादायक ठरत आहे. त्यात आता या पुलावर पडलेल्या खड्ड्यांचीही भर पडली असून गेल्या 2 आठवड्यापासून अपघातांची संख्या वाढू लागली आहे. अंधारात या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने काही जण त्यात धडपडत आहेत.

दरम्यान भौगोलिकदृष्ट्या या पुलाचा विचार केला असता जरी कल्याणला जोडून हा पूल असला तरी पूल पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे साहजिकच त्याची देखभाल दुरुस्तीही पीडब्ल्यूडीकडेच आली. ही प्रशासकीयदृष्ट्या फोड करण्यात आली असली तरी या पुलावरून जाणारे नागरिक हे शासनानेच करदाते आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा पूल कोणाच्या अखत्यारित येतो आणि त्यावरील खड्डे भरायची जबाबदारी कोणत्या शासकीय विभागाची आहे या तांत्रिक मुद्द्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाहीये. त्यापेक्षा या पुलावर पडलेले खड्डे भरण्यात येऊन भविष्यात होणारा एखादा मोठा अपघात किंवा जाणारा कोणाचा जीव वाचणे ही त्याहून अधिक मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे.

यासंदर्भात खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत त्यांनी त्वरित पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर येत्या 2 दिवसांत हे खड्डे भरण्यात येणार असल्याचे आश्वासन पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा