Home ठळक बातम्या राहूल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकर कळलेच नाही – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

राहूल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकर कळलेच नाही – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

शिवसेना भाजपच्या डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली दि.२ एप्रिल :
काँग्रेससह युपीएकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम सुरूच असून राहूल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कधी कळलेच नाही असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाविरोधात शिवसेना भाजपतर्फे डोंबिवलीमध्ये काढण्यात आलेल्या गौरवयात्रेच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी राहूल गांधी यांच्यासह महविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेबाबत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. आणि या विधानाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत असून राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील शिवसेना भाजप सरकारतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. डोंबिवलीमध्येही या सावरकर गौरवयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. डोंबिवली पश्चिमेतून निघालेल्या या स्वागतयात्रेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राहूल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान कधी कळलेच नाही. त्यामुळेच तर काँग्रेस आणि यूपीएमधील घटक पक्ष सतत त्यांचा अपमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधातील एकही चुकीचे विधान अजिबात खपवून घेतले जाणार नाही. राहूल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

तर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्या वक्तव्याबाबत रविंद्र चव्हाण यांना विचारले असता त्यांनी कोण रोहीत पवार? त्यांची काय औकात आहे अशा तिखट शब्दांमध्ये चव्हाण यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कदापीही सहन करणार नाही – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अपरिमित असे हाल आणि अपेष्टा सोसल्या आहेत. जन्मठेपेच्या शिक्षेवेळी अंदमानातील कारागृहात सावरकर यांनी दिलेल्या बलिदानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कदापीही सहन केला जाणार नाही असा इशारा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिला. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे आघाडी सरकारच्या नेत्यांकडे त्याविषयी बोलण्यासाठी मुद्दे नसल्यानेच सावरकरांसारख्या वंदनीय व्यक्तींचा अवमान केला जात असल्याची टीकाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. तर महाविकास आघाडीकडून आपल्या सभांमधूनही सतत टीका केली जात आहे कारण त्यांचे सरकार असताना अडीच वर्षांत त्यांनी कोणतीच विकासकामे केली नसल्याचे टीकास्त्रही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सोडले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा