Home ठळक बातम्या कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान क्रॉसिंग पॉइंट तुटल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम; प्रवाशांचे अतोनात हाल

कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान क्रॉसिंग पॉइंट तुटल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम; प्रवाशांचे अतोनात हाल

डोंबिवली, दि.16 मार्च :
कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान येथे रेल्वे क्रॉसिंग दरम्यान अचानक क्रॉसिंग पॉईंट तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे कल्याण कर्जत मार्गावर हा बिघाड झाला असला तरी त्याचा कसारा मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. कल्याण कर्जत आणि कल्याण कसारा हे दोन्ही मार्ग ऐन संध्याकाळच्या वेळेस विस्कळीत झाल्याने आधीच उष्णतेच्या लाटेने त्रस्त झालेल्या प्रवाशांचे आणखीनच हाल झाले.

कल्याण -विठ्ठलवाडी स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाच्या पॉईंट नंबर 76 जवळ हा बिघाड झाला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या बिघाडाने अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेला गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. संध्याकाळची वेळ असल्याने या सर्व लोकल गाड्या खचाखच भरलेल्या होत्या. आधीच दिवसभर आग ओकणारा सूर्य आणि संध्याकाळीही जाणवणारे या गर्मीच्या चटक्यांनी या खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाशांना अगदी नकोसे करून सोडले. लोकलसोबतच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या बिघाडाचा परिणाम झाला. म्हणूनच काही जणांनी लोकलमधून ट्रॅकवर उतरत पायी चालणे पसंत केले. तर लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्टेशनवरही तोबा गर्दी झालेली पाहायला मिळाली. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने विशेषतः कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागला.

दरम्यान या बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेत युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. साधारणपणे तासभराच्या अथक मेहनतीनंतर अखेर हा बिघाड दुरुस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. आणि 7.20 मिनिटांनंतर हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठीं प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरद्वारे दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा