Home ठळक बातम्या टिटवाळ्यातील काळू नदीलगत आढळले दुर्मिळ देवगांडुळ (caecilian)

टिटवाळ्यातील काळू नदीलगत आढळले दुर्मिळ देवगांडुळ (caecilian)

 

टिटवाळा दि.25 जून :
टिटवाळा येथील काळू नदीलगत असलेल्या परिसरात देवगांडुळ ( सिसिलिअन) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापसारखा दिसणारा हा जीव या परिसरात रस्ता ओलांडत असताना जखमी झाल्याचे काही नागरिकांना आढळून आले होते. स्थानिकांनी याबाबत वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशनला याची माहीती दिली. वॉर रेस्क्यूच्या टिटवाळा टिमचे सर्पमित्र धनुष वेखंडे आणि सुमित भडांगे यांनी घटनास्थळी धाव घेत हा देवगांडुळ सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी हा मांडूळ असल्याचा भास त्यांना झाला. परंतू कल्याण येथील वन्यजीव रक्षक प्रेम आहेर यांनी ओळख पटवण्यासाठी BNHS (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) कडे संपर्क साधल्यानंतर बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या डाॅ. वरद गिरी, सरिसृप संशोधक यांची मदत मिळवली.

या जीवाला शास्त्रीय भाषेत  Ichthyophis bombayensis इंग्लिश मध्ये  Bombay caecilian तर मराठीत देवगांडूळ असे म्हणतात. हा उभयचर जीव असून पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी तो राहू शकतो. याचे मुख्य अन्न गांडूळ असून स्वःसंरक्षणासाठी तो स्वतःच्या शरीरावर चिकट स्त्राव सोडतो. त्यामुळे त्याचे शरीर खुप गुळगुळीत होत असल्यानेच त्याला सहज पकडणे सहज शक्य होत नाही. हा जीव प्रमुख्याने पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. टाचणीच्या आकाराचे सहज न दिसणारे डोळे आणि गोलाकार रिंगण असलेले शरीर यावरून त्याची ओळख निश्चित करता येत असल्याची माहिती वाॅर फाऊंडेशनच्या टिमने दिली.

या सिसिलिअन उभयचर जीवाला वनविभागाच्या परवानगीने कल्याण येथील खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रायभोळे यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर आता तज्ञव्यक्ती आणि वनविभागाच्या परवानगीने शास्त्रीय नोंदी घेऊन त्याला निर्सगमुक्त करण्यात येणार असल्याचे वाॅर फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार (वन्यजीव अभ्यासक) यांनी सांगितले.

तर कल्याण डोंबिवली आणि टिटवाळ्यातील जैवविविधतेचा परिपूर्ण अभ्यास करून असून वन्यजीव- इतर जीवाची नोंद करणे अत्यावश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जैवविविधता नोंद वही असून त्यात या उभयचर वर्गातील सिसिलिअन (देवगांडूळ) याची नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे वाॅर फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगीतले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा