Home क्राइम वॉच दिड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या डोंबिवलीच्या रुद्रची पोलिसांकडून सुखरूप सुटका

दिड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या डोंबिवलीच्या रुद्रची पोलिसांकडून सुखरूप सुटका

रुद्रच्या सुटकेसाठी पोलिसांचे तब्बल 75 तासांचे नॉनस्टॉप ऑपरेशन

डोंबिवली दि. 13 नोव्हेंबर :
तब्बल दिड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या डोंबिवलीतील बारा वर्षांच्या मुलाची पोलिसांनी जीवाची बाजी लावत सुखरूप सुटका केली. या मुलाच्या सुटकेसाठी पोलिसांनी 75 तास नॉनस्टॉप ऑपरेशन राबवत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

रात्री क्लासवरून परतत असताना अपहरण…

डोंबिवलीत राहणारे व्यापारी रणजीत झा यांचा बारा वर्षाचा मुलगा रुद्रचे 9 नोव्हेंबरच्या रात्री क्लासवरून परतत असताना अपहरण करण्यात आले. तसेच अपहरणकर्त्यानी त्याच्या वडिलां फोन करून दिड कोटींची खंडणी मागितली. मात्र रूद्रच्या वडिलांनी मानपाडा पोलिसांशी संपर्क साधून मुलाचे अपहरण झाल्याची माहिती दिली.मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनाही याबाबत माहिती दिली.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींच्या गाडीचा काढला माग…

त्यानुसार पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता वेगाने तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. खबऱ्यांमार्फत आणि शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत लावण्यात आले आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींच्या गाडीचा माग काढला. ही गाडी डोंबिवली, बदलापूर, खडवली, जव्हार, पालघरमार्गे पुढे गुजरातच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमा भागात आरोपींच्या मागावर वेगवेगळी पथके पाठवत तपास सुरू केला.

आरोपींनी थेट पोलिसांच्याच अंगावर गाडी घातली…

त्यावेळी मोखाडा परिसरातून आरोपीची गाडी जात असल्याची माहिती त्याच परिसरात असणाऱ्या पोलिसांच्या एका पथकाला मिळाली. त्यांनी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपींनी थेट पोलिसांच्याच अंगावर गाडी घालत मुख्य रस्त्याऐवजी जंगलातील कच्च्या रस्त्याने गाडी नेली. पोलिसांनी जंगलातही त्यांचा पाठलाग केला असता आरोपींनी जंगलात गाडी तशीच सोडून रुद्रला घेऊन तिकडून पळ काढला.

20 जणांच्या टीमने संपूर्ण गावाला वेढा घातला…

मग मात्र बराच काळ पोलिसांना त्यांचा काही सुगावा लागत नव्हता. मात्र पोलिसांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. गूजरात राज्यातील खुडसत गावातील एका घरात आरोपी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि 20 जणांच्या टीमने संपूर्ण गावाला वेढा घातला. आणि आरोपी बेसावध असल्याचे पाहत त्या घरावर छापा टाकून रुद्रची सुखरूप सुटका केली.

मुख्य सूत्रधारासह 5 जणांना बेड्या…

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी फरहदशहा रफाई, प्रिंसकुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहिन सिंग, आणि नाझिया रफाई यांना रंगेहाथ अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. तर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा