Home ठळक बातम्या वीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या तोंडून 5 वाक्य बोलून दाखवा – नरेंद्र मोदी...

वीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या तोंडून 5 वाक्य बोलून दाखवा – नरेंद्र मोदी यांचे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना आव्हान

हिंदू – मुस्लिमांसाठी वेगळे बजेट आणण्याची काँग्रेसची इच्छा होती

कल्याणातील विजय संकल्प सभेत मोदींकडून काँग्रेसवर हल्लाबोल

कल्याण दि.15 मे :
नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी राहुल गांधी यांच्या तोंडून वीर सावरकरांबाबत 5 वाक्यं बोलवून दाखवावी, असे खुले आव्हान देत देशामध्ये मुस्लिमांसाठी वेगळे आणि हिंदूंसाठी वेगळे बजेट आणण्याची काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची इच्छा होती असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कल्याणात केला. (Loksabha elections – Say 5 sentences from Rahul Gandhi’s mouth about Veer Savarkar – Narendra Modi’s challenge to Sharad Pawar and Uddhav Thackeray)

महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याणात झालेल्या विराट विजय संकल्प सभेमध्ये मोदी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाच्या विकासाचा, प्रगतीचा आलेख मांडण्यासह विरोधकांवर तूफान हल्ला चढवला. मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात करत कल्याणमधील दुर्गाडी देवी, तिसाई देवी आणि अंबरनाथच्या महादेवाला नमन करताच उपस्थितांनी मोदी नामाचा गजर करण्यास सुरुवात केली.

ओबीसी आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव…
नेहरूंच्या काळापासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब..गरीब… अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून, देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव असल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहजादेंविरोधात नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तोंडाला कुलूप, डोळ्यावर पट्टी बांधली असल्याची जोरदार टीका केली. इंडी आघाडीकडून हिंदू-मुस्लिम असा खेळ केला जात असून ते आपल्यावर आरोप करत आहेत. मात्र आपण त्यांचा हा खेळ देशवासीयांसमोर उघड करत असल्यानेच ते बिथरले असल्याचे मोदी म्हणाले. आई-वडिलांची आठवण काढण्यासाठीही त्यांना अल्बम उघडून पाहवा लागत असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

बाळासाहेबांचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे…
काँगेसने ओबीसी, दलित आणि आदिवासींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्यासाठी कर्नाटक ही प्रयोगशाळा केली आहे. कर्नाटकात सत्ता मिळाल्यावर एका रात्रीत ओबींसीचे आरक्षण मुस्लिमांना दिले गेले. देशात अशाच पद्धतीने मुस्लिमांना आरक्षण देण्याचा त्यांचा असून त्यासाठी वोट जिहाद’ घडविले जात आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रातील इंडी आघाडीच्या एकाही नेत्याने विरोध केला नसल्याचे सांगत कॉंग्रेसला महाराष्ट्रातील जनता मत देईल का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. तर कॉंग्रेसकडून दहशतवादाचे समर्थन केले जात असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

युवकांना नाविन्यपूर्ण कल्पना पाठवाव्या…
त्याचबरोबर विकसित भारत घडविण्यासाठी पहिल्या १०० दिवसांत ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. त्यात देशातील युवकांचा सहभाग असावा, यासाठी आणखी २५ दिवसांचा कालावधी वाढवणार असल्याचे सांगत त्यांनी युवकांना नाविन्यपूर्ण कल्पना पाठविण्याचे आवाहन केले.

या दोघांचे मत आपल्याच खात्यात…
भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील आणि कल्याणमधून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करावे. या दोघांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींच्याच खात्यात जाईल. कपिल पाटील यांनी मंत्रिमंडळात काम केले असून, ते विकासासाठी कायम कार्यरत आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या अखेरीस केले.

कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्याना लाज कशी वाटणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसाला निवडणुकीच्या प्रचारात उतरवून पाकिस्तानच्या घोषणा दिल्या गेल्या. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार ? असा परखड सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने विकासाचा माहौल तयार झाला असल्याचे सांगून महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.

भिवंडी – कल्याण लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे झाली आहेत. भिवंडी-कल्याणवासीयांनी महायुतीला दिलेल्या एका मताने मेट्रो, स्मार्ट सिटी, मोफत घरे अशी अनेक कामे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भिवंडी-कल्याणचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. जनसामान्यांची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. पाच वर्षात देशासाठी एक दिवस देऊन आवर्जून मतदान करून नरेंद्र मोदींना साथ द्यावी, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले.

लोकसभेची निवडणूक तिसऱ्यांदा लढवत आहे. त्याच्या प्रचारार्थ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा कल्याणमध्ये आल्याने प्रचंड बहुमताने आमची हॅटट्रिक तिसऱ्यांदा होणार आहे, असे मत कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडले. गेल्या १० वर्षात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघात रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक सेवा आणि आरोग्य सुविधा या सगळ्या गोष्टी करू शकलो. माझ्या कल्याण लोकसभेत गेल्या दहा वर्षात रेल्वे सुविधा उभारण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी आला. पाचवी सहावी मार्गिका सुरू झाली. रेल्वेत अतिरिक्त सुविधा मिळाल्या. रेल्वे संबंधी कामे केली आणि त्याचा आज प्रवाशांना फायदा होत असल्याचे समाधान आहे, असेही डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, महेश चौघुले, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार नरेंद्र पवार यांची भाषणे झाली

या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपाचे आमदार गणेश नाईक, किसन कथोरे, शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, कुमार आयलानी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा