Home Uncategorised शनिवार -रविवारी दुकाने बंद ठेवण्यावरून कल्याण डोंबिवलीत व्यापारी आक्रमक

शनिवार -रविवारी दुकाने बंद ठेवण्यावरून कल्याण डोंबिवलीत व्यापारी आक्रमक

 

कल्याण – डोंबिवली दि.27 मार्च :
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत आजपासून अत्यावश्यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसी प्रशासनाने दिले आहेत. मात्र या आदेशांवर कल्याण डोंबिवलीतील व्यापारी आणि दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना केवळ आमच्याच दुकानातून पसरतो का? आणि दुकाने बंद ठेवली तर आम्ही जगायचे कसे? असे संतप्त सवाल करत कल्याण डोंबिवलीमध्ये व्यापारी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. (Shop keepers are aggressive in Kalyan Dombivali due to closure of shops on Saturday and Sunday)

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवार आणि रविवारसाठी नविन आणि आणखी कठोर निर्बंध लागू केले. ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले. मात्र या नव्या निर्बंधांना 12 तासही उलटत नाहीत तोच दुकानदार आणि व्यापारी वर्गाने त्यावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीमध्ये सर्व दुकानदारांनी आपापली दुकाने बंद करून केडीएमसीच्या विभागीय कार्यालयावर ठिय्या मांडला. तर कल्याणातही व्यापारी आणि दुकानदारांनी दुकाने बंद करून एकत्र येत केडीएमसी प्रशासनाचा निषेध केलेला पाहायला मिळाला. शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच आमचा व्यवसाय होत असतो आणि केडीएमसी प्रशासनाने नेमके याचदिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही काय करायचे? आमच्या दुकानात काम करणाऱ्यांचा पगार, लाईट बिल, टॅक्स आम्ही कसा भरणार? दुकाने बंद ठेवण्यास लावून केडीएमसी आम्हाला आर्थिक मदत करणार का? यासारखे अनेक संतप्त सवाल या व्यापाऱ्यांनी एलएनएनशी बोलताना उपस्थित केले.

त्यामुळे एकंदर कोरोनाची वाढती परिस्थिती आणि दुकाने बंद ठेवण्यावरून आक्रमक झालेले व्यापारी या दोन्ही प्रश्नांमध्ये केडीएमसी प्रशासन आता कसा मार्ग काढणार हे लवकरच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा