Home ठळक बातम्या कल्याणात चिमुकल्या वारकऱ्यांची अनोखी दिंडी ; पर्यावरण रक्षणासह दिला एकतेचा संदेश

कल्याणात चिमुकल्या वारकऱ्यांची अनोखी दिंडी ; पर्यावरण रक्षणासह दिला एकतेचा संदेश

बालक मंदिर संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पुढाकार

कल्याण दि.२८ जून :
आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात आज सकाळी काढण्यात आलेली चिमुकल्या वारकऱ्यांच्या अनोख्या दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधले. एकीकडे विठुरायाचा गजर तर दुसरीकडे पर्यावरण रक्षणासह सामाजिक एकतेचा संदेश देत या चिमुकल्या वारकऱ्यांनी सामाजिक भान जपलेले पाहायला मिळाले.

कल्याणच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक नामांकित संस्था असणाऱ्या बालक मंदिर संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांकडून या अनोख्या वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वारकरी दिंडीमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील तब्बल ५०० विद्यार्थी सहभाग झाले होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बालक मंदिर संस्था, लोकमान्य टिळक चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, शंकरराव चौकातून या चिमुकल्या वारकऱ्यांची ही दिंडी छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल मंदिरात पोहोचली.

एकीकडे आसमंतातून कोसळणारा वरुणराजा तर दुसरीकडे या चिमुकल्या वारकऱ्यांच्या मुखातून बरसणारा विठुरायाचा नाम गजर. अशा अतिशय भक्तिमय आणि आनंदी वातावरणात हा वारी सोहळा संपन्न झाला. तर या दिंडीत सहभागी चिमुकल्या वारकऱ्यांनी विठ्ठल रुख्मिणी, संत नामदेव, संत तुकाराम यासारख्या विविध संतांची अतिषय सुंदर अशी वेशभूषा साकारली होती. तर मुलींनी नऊवारी साडी आणि मुलांनी वारकऱ्यांचा पारंपारिक पोशाख परिधान केल्याने या वारकरी दिंडीची रंगत अधिकच वाढली. वारक-यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हातात टाळ घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करीत होते. लेझीमच्या तालावर ठेका घेत सर्व शिक्षक विद्यार्थी रिंगण करत होते.

वारकरी दिंडीत “झाडे लावा, झाडे जगवा “प्लास्टिकचा वापर टाळा -पर्यावरणाचे रक्षण करा” यासारख्या पर्यावरणविषयक संदेशांसोबतच आपण वेगवेगळ्या जाती धर्मातील विभागले गेलो असलो तरी आपण सर्व एकच असल्याचा सामाजिक संदेशही विद्यार्थ्यांकडून देण्यात आला.

या सोहळ्याला शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार, सुवर्णा ठाकरे, शालेय समिती अध्यक्ष रमेश गोरे, संस्था कार्यवाह डॉ. सृश्रुत वैद्य, इंग्रजी माध्यम शालेय समिती अध्यक्ष तेजस्विनी पाठक, प्रसाद मराठे, अनिल कुलकर्णी यांसह शालेय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक वर्गाने मोठी मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा