Home ठळक बातम्या …म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

…म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

 

कल्याण दि. 7 जुलै :
महाराष्ट्रातील नव्या सरकारची बहुमत चाचणी होऊन अवघे काही दिवसही उलटले नसून अद्याप मंत्रीमंडळ विस्तारही झालेला नाहीये. तोच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले असले तरी या भेटीत राजकीय नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत झालेल्या विषयांची सविस्तर माहिती दिली.

जवळपास अडीच वर्षे चाललेले राज्यातील हे महविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडानंतर उलथवून टाकले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या आणि इथल्या ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या योजनांना गती देण्याची आग्रही मागणी केल्याचे हिंदुराव यांनी सांगितले.

यामध्ये प्रामुख्याने एम एम आर डी एच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. जेणेकरून पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज,सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, दळण वळण,पाणी पुरवठा आदी महत्वाच्या बाबींचा जलद विकास करणे सोपे जाईल. तसेच कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित केलेला 400 कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, कल्याण आणि मुरबाड तालुक्यात महिलांसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट सुरू करावी, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आरक्षित जागेवर प्रस्तावित शासकीय रुग्णालयाला मान्यता द्यावी, बेस्टच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी एकच वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे, मेट्रो रेल्वेचा कल्याणपुढील उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर आणि मुरबाडपर्यंत विस्तार करावा अशी मागणी आपण यावेळी केल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्व प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याकडून या गोष्टींना प्राधान्य देऊन त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू होईल असा विश्वासही हिंदुराव यांनी व्यक्त केला.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रमोद हिदुराव यांच्यासह प्रसाद महाजन, प्रदेश सचिव, रमेश हनुमंते प्रदेश सरचिटणीस भरत गोंधळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, प्रविण खरात प्रदेश चिटणीस दिनेश पटेल व्यापारी सेल शहर सचिव, प्रसाद सदलगे जिल्हा उपाध्यक्ष, रेखा सोनावणे जिल्हा उपाध्यक्ष, सुरय्या पटेल जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अय्याज मौलवी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा