
कल्याण | ६ मे :
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी खेळ, मोबाईल, कार्टून, दंगा-मस्ती आणि आराम… पण कल्याणातील दोन चिमुकल्यांनी या सुट्टीला एक वेगळाच अर्थ दिला आहे. ज्या वयात अनेक मुलं वेळ घालवत असतात, त्या वयात ही दोन मुलं मात्र “उद्योजकतेचे पहिले धडे” गिरवत आहेत. दोघांचीही नावं आहेत यश्मीर आणि गर्व. (Today’s Children, Tomorrow’s Entrepreneurs; Two Boys from Kalyan Learn the Lessons of Entrepreneurship)
कल्याणच्या संतोषी माता मार्गावरील एका छोट्याशा कोपऱ्यावर उभा असलेला त्यांचा साधासुधा सरबताचा स्टॉल आज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. उन्हाच्या कडक झळांमध्ये चेहऱ्यावर निरागस हास्य ठेवत ग्राहकांना थंडगार सरबत देणारी ही मुलं केवळ सरबत विकत नाहीत… तर मेहनत, स्वावलंबन आणि मोठी स्वप्नं विकत आहेत. कल्याणातील नामांकित सीए कौशिक गडा यांनी या दोघा मुलांची ही धडपड सर्वांसमोर आणली आहे.
हातात मोबाईलऐवजी सरबताचा ग्लास… आणि वेळ घालवण्याऐवजी भविष्य घडवण्याची धडपड… हे चित्र पाहून अनेकजण थबकून त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.
“मोठे झाल्यावर आम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे… म्हणून आतापासूनच अनुभव घेत आहोत,” असे आत्मविश्वासाने सांगताना त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसणारी चमक ही फक्त दोन मुलांची नाही, तर नव्या पिढीच्या सकारात्मक विचारांची झलक आहे.
आजच्या डिजिटल युगात अनेक मुलं स्क्रीनमध्ये हरवताना दिसतात. अशा काळात कल्याणातील ही दोन चिमुकली मेहनतीचे महत्त्व, ग्राहकांशी संवाद, पैशाची किंमत आणि जबाबदारी यांचे धडे प्रत्यक्ष आयुष्यातून शिकत आहेत.
विशेष म्हणजे, या छोट्याशा स्टॉलमागे फक्त पैसे कमावण्याचा हेतू नाही, तर “स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न” आहे. आणि म्हणूनच हा सरबताचा स्टॉल एका व्यवसायापेक्षा अधिक… प्रेरणेचा विषय ठरत आहे.
रस्त्यावरून जाणारे अनेक नागरिक या मुलांकडे कौतुकाने पाहतात, काही जण मुद्दाम थांबून सरबत घेत त्यांना प्रोत्साहन देतात. कारण या मुलांच्या कष्टात त्यांना उद्याचा आत्मनिर्भर भारत दिसतो…
कल्याणातील या दोन छोट्या उद्योजकांनी एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध केली आहे —“मोठं होण्यासाठी वय नाही, तर विचार मोठे असावे लागतात.”

























