Home ठळक बातम्या आगडोंब : डोंबिवली एमआयडीसीतील दोन कंपन्या भीषण आगीमध्ये भस्मसात

आगडोंब : डोंबिवली एमआयडीसीतील दोन कंपन्या भीषण आगीमध्ये भस्मसात

कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या शहरांतून आले अग्निशमन दल

डोंबिवली दि.९ मार्च :

डोंबिवली एमआयडीसी भागातील दोन कंपन्यांना बुधवारी रात्री १ च्या सुमारास भीषण आग लागली. खंबाळपाडा एमआयडीसी फेज १ मधील परफ्यूम बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुरुवातीला आग लागली आणि तीच आग नंतर शेजारच्या कपड्याच्या कंपनीत पसरली. ही आगीची घटना इतकी मोठी होती की केडीएमसी अग्निशमन दलाला तब्बल २० गाड्यांना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तर त्याला लागूनच सीएनजी पंप असल्याने आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Two companies in Dombivli MIDC were gutted in a fierce fire)

शेजारीच सीएनजी पंप असल्याने अग्निशमन दलाच्या तब्बल २० गाड्या घटनास्थळी…
रात्री १ वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला या आगीची माहिती मिळाली. या आगीची भीषणता आणि त्याशेजारी असणारा सीएनजी पंप पाहता भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलालाही याठिकाणी मदतीसाठी बोलवण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी हे स्वतः जातीने आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

सीएनजी पंपावर अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांद्वारे कुलिंग…
या आग लागलेल्या कंपन्यांच्या शेजारीच असणाऱ्या सी एन जी पंपा पर्यंत आग पासरल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता गृहीत धरून अग्निशमन दलाने महानगर गॅसला तातडीने इथला गॅसचा पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याठिकाणी शिल्लक असणाऱ्या २०० लीटर गॅसच्या टाकीवर सतत पाण्याचा मारा केला जात आहे. याठिकाणी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तैनात करण्यात आल्याची माहितीही मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

आग लागल्यानंतर कंपनीमध्ये मोठे स्फोट…
दरम्यान आग लागल्यानंतर या दोन्ही कंपन्यांमध्ये सातत्याने मोठ मोठे स्फोट झाल्याने अवघ्या काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. यातील एक कंपनी ही परफ्युम तयार करणारी असून दुसऱ्या कंपनीत कापड निर्मिती केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राज आणि रामसन्स अशी या दोन्ही कंपन्यांची नावे असल्याचीही प्राथमिक माहिती आहे. तर या आगीमध्ये जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा