Home ठळक बातम्या डोंबिवलीतील केमिकल कंपन्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी अनोखा ‘बायोटेक्नॉलॉजी प्रकल्प’ कार्यान्वित

डोंबिवलीतील केमिकल कंपन्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी अनोखा ‘बायोटेक्नॉलॉजी प्रकल्प’ कार्यान्वित

कामा संघटनेच्या पुढाकाराने राबविण्यात येतोय पथदर्शी प्रकल्प

डोंबिवली दि.18 जून :
कधी हिरवा पाऊस तर कधी गुलाबी रस्ता, कधी उग्र दर्प तर कधी रस्त्यावर वाहणारे केमिकलचे पाणी…प्रदूषणाच्या अशा विविध कारणांसाठी गेल्या काही वर्षांपासून गाजत असणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपन्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. हा प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केमिकल कंपन्यांची मुख्य संस्था असणाऱ्या ‘कामा’ संघटनेने बायोटेक्नॉलॉजीची (जैव तंत्रज्ञान) मदत घेतली आहे. त्याअंतर्गत 10 हजार लिटर केमिकल पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका पायलट प्रोजेक्टची आजपासून सुरुवात करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली आणि एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमधील प्रदूषणाचा विषय सतत ऐरणीवर आला आहे. इथल्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्यासह त्यांना थेट टाळे ठोकण्याचा इशाराही शासनाकडून देण्यात आला होता. मात्र या केमिकल कंपन्यांची संघटना असणाऱ्या ‘कामा'(कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) ला या प्रदूषणाच्या प्रश्नावर आता जैव तंत्रज्ञानाद्वारे रामबाण इलाज सापडला आहे. आज कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या हस्ते या अनोख्या बायोटेक्नॉलॉजी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. 24 तासाला तब्बल 10 हजार लिटर केमिकल पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुनर्वापर करण्यायोग्य बनवण्याची या प्लॅन्टची क्षमता आहे. पुढील काही दिवस या प्रकल्पाची ट्रायल घेतल्यानंतर मग एमआयडीसीतील प्रत्येक केमिकल कंपनीत तो कार्यान्वित केला जाणार आहे. ज्यामुळे कंपन्यामधून निघणाऱ्या घातक रसायन मिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन हे सांडपाणी पूर्णपणे स्वच्छ करणारा प्लांट सीईटीपीच्या परिसरात कार्यान्वित करण्यात आला आहे. बायोनेस्ट कंपनीने बनवलेल्या या प्लॅन्टसाठी १८ लाखाचा खर्च आला त्यामध्ये केमिकलच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारच्या झाडांची लागवडही करण्यात आली आहे. यामध्ये आलेल्या केमिकल मिश्रित सांडपाण्यावर जिवाणूंमार्फत योग्य ती प्रक्रिया झाल्यावर ते पूर्णपणे केमिकलचे रंग आणि दुर्गंधीमुक्त होते. परिणामी या पाण्याचा पुनर्वापरही केला जाऊ शकतो असेही सोनी यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे याकरता कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रिसिटीचा किंवा इतर रसायनाचा वापर होत नसल्याने या प्रकल्पासाठी कोणताही खर्च नाही. औरंगाबादच्या यश फाऊंडेशन या कंपनीने बायोनेस्ट हे सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा