Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात 6 हजार 604 मतदान केंद्र ; 3 हजार 325 मतदान...

ठाणे जिल्ह्यात 6 हजार 604 मतदान केंद्र ; 3 हजार 325 मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग

ठाणे दि.19 मे:
ठाणे जिल्ह्यातील (23) भिवंडी, (24) कल्याण आणि (25) ठाणे या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 66 लाख 78 हजार 476 मतदार असून त्यांच्यासाठी जिल्ह्यात एकूण 6 हजार 604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी 36 मतदान केंद्रे ही सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (6 thousand 604 polling stations in Thane district; 3 thousand 325 polling stations will be webcasted)


सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर…

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रे उभारण्यात आली असून सुलभ निवडणूक संकल्पनेनुसार ही सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर स्थापित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, उन्ह लागू नये म्हणून सावलीची व्यवस्था, रॅम्प, व्हिलचेअर आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

मुरबाडमध्ये सर्वाधिक तर उल्हासनगरमध्ये सर्वात कमी केंद्र…
ठाणे जिल्ह्यात 6 हजार 604 मतदान केंद्रे उभारण्यात असून एकट्या 23 भिवंडी लोकसभेत 2 हजार 191 केंद्रे आहेत. भिवंडी ग्रामीण (अ.ज) – 345 मतदान केंद्रे, शहापूर (अ.ज.) – 326 मतदान केंद्रे, भिवंडी पश्चिम – 297 मतदान केंद्रे, भिवंडी पूर्व – 314 मतदान केंद्रे, कल्याण पश्चिम – 398 आणि मुरबाडमध्ये 511 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 1 हजार 960 मतदान केंद्रे असून यामध्ये अंबरनाथ (अ.जा.) – 319 मतदान केंद्रे, उल्हानगर- 251 मतदान केंद्रे, कल्याण पूर्व – 321 मतदान केंद्रे, डोंबिवली – 269 मतदान केंद्रे, कल्याण ग्रामीण – 406 आणि मुंब्रा कळवा – 394 मतदान केंद्रे आहेत.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 2 हजार 453 मतदार केंद्रांची असून त्यात मिरा भाईंदर – 451 मतदान केंद्रे, ओवळ माजिवाडा – 466 मतदान केंद्रे, कोपरी पाचपाखाडी – 366 मतदान केंद्रे, ठाणे – 361 मतदान केंद्रे, ऐरोली – 429 आणि बेलापूरमध्ये 380 मतदान केंद्र आहेत.

यातही मुरबाड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 511 मतदान केंद्रे आहेत. तर सर्वात कमी मतदार केंद्रे उल्हासनगर विधानसभा मतदार संघात 251 मतदार केंद्रे आहेत.

मॉडेल मतदान केंद्रे
यामध्ये जिल्ह्यात एकूण 18 मतदान केंद्रे ही महिलांद्वारे चालविण्यात येणार आहेत. तसेच 18 मतदान केंद्रे ही दिव्यांग आणि 18 मतदान केंद्रे ही युवकांद्वारे चालविण्यात येणार आहेत.

3 हजार 325 मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग
जिल्ह्यातील 6 हजार 604 पैकी 3 हजार 325 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 107 मतदान केंद्रे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील 991 केंद्रे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 227 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

दरम्यान आज सकाळपासून ठाणे जिल्ह्यातील या सर्व मतदान केंद्रांसाठी संबंधित ठिकाणांहून मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा