Home ठळक बातम्या डोंबिवलीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

डोंबिवलीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

 

डोंबिवली दि.17 एप्रिल :

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवर असणाऱ्या कपड्याच्या दुकानाला शनिवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात कपडे आणि लाकडी शोकेस असल्याने  आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केलेले पाहायला मिळाले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून या आगीत मात्र दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

डोंबिवली पूर्वेत शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या शेजारील इमारतीमध्ये असणाऱ्या रिस्पॉन्स नावाच्या कपड्याच्या दुकानातून अचानक धूर येऊ लागला. स्थानिक नागरिकांनी आपल्या परीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणार्धात या आगीने अत्यंत रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानामध्ये ती पसरली. तसेच या आगीच्या झळांमुळे शेजारील दुकानांचेही मोठे नुकसान झाले.

तर महापालिका अग्निशमन दलाच्या 4 गाड्यानी घटनास्थळी धाव घेत  अग्निशमन दल जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दुसरीकडे आग लागल्याचे कळताच परिसरातील बघ्यांपैकी सारेच मोठी गर्दी करून मोबाईलवर छायाचित्रे आणि व्हिडीओ शूटींग काढण्यात दंग होते. या गर्दीला हटविण्यासाठी पोलिसांना बरेच झगडावे लागले.

दरम्यान सध्या लॉकडाऊन असल्यामुळे दुकान बंद होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील लाखो रुपयांचे कपडे आणि साहित्य त्यात जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा