Home ठळक बातम्या कल्याणच्या सप्तसुरांच्या जल्लोषात न्हाऊन निघाले कल्याणकर रसिक; स्वागत यात्रेनिमित्त पूर्वसंध्येला झाला बहारदार...

कल्याणच्या सप्तसुरांच्या जल्लोषात न्हाऊन निघाले कल्याणकर रसिक; स्वागत यात्रेनिमित्त पूर्वसंध्येला झाला बहारदार कार्यक्रम

कल्याण दि.8 एप्रिल :
कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. एकीकडे सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, मिमिक्री आर्टिस्ट डॉ. संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पहिल्यांदाच गेले 3 दिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला वासुदेव बळवंत फडके मैदानात जल्लोष सप्तसुरांचा हा अतिशय सुंदर असा सूरमयी कार्यक्रम संपन्न झाला. ज्यामध्ये नचिकेत लेलेच्या गाण्याने, आशिष पाटीलच्या मनमोहक नृत्याने, डॉ. संकेत भोसलेच्या रंजक मिमिक्रीने आणि आदिती सारंगधर या चौघांच्या दिलखेचक अदाकारीने या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

दरम्यान यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्ताने नयनरम्य अशा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही नागरिकांना 20 मे रोजी मोठ्या संख्येने मतदानाचा आपला हक्क बजवणायचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ इंदू राणी जाखड, कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, नववर्ष स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निखिल बुधकर कल्याणातील प्रतिष्ठीत संस्था, त्यांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर कल्याणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा