कल्याणच्या सर्व रोटरी क्लबचा पुढाकार
कल्याण दि.2 मार्च :
कल्याणची आता काहीशी कॉस्मोपॉलिटीन शहराकडे वाटचाल होत असली तरी या शहराला अतिप्राचीन अशी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. काळाच्या ओघाबरोबरच सरकारी अनास्थेमुळे इथला बराचसा सांस्कृतिक ठेवा नामशेष झाला आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजता येईल अशा सध्या अस्तित्वात असणाऱ्या पुरातन आणि ऐतिहासिक वास्तूंपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशाने पावन झालेल्यापोखरण तलाव परिसर. ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करूनही त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे आणि त्याच्या संवर्धनाकडे लक्ष वेधण्यासाठी कल्याणच्या सर्व रोटरी क्लबच्या माध्यमातून पोखरण परिसरात दिपोत्सव करण्यात आला.
साधारणपणे 10 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नांमुळे पोखरण तलाव परिसराला ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला. मात्र त्यानंतर आजतागायत ना शासनाकडून न इथल्या लोकप्रतिनिधींकडून या ऐतिहासिक पोखरणच्या जतन -संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
नेमका हाच धागा पकडत रोटरी क्लब ऑफ कल्याण, कल्याण रिव्हरसाईड, सेंट्रल कल्याण, कल्याण डायमंड आणि कल्याण टायगर्स अशा विविध संस्थांनी एकत्र येत महाशिवरात्रीच्या निमित्ताने याठिकाणी दिपोत्सव राबवत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तसेच रोटरीच्या सदस्यांनी या तलाव परिसरात स्वछता अभियानही राबवत नष्ट होत जाणारा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी सरकारने पाऊलं उचलण्याची गरज व्यक्त केली. रोटरीचे पदाधिकारी आणि सदस्य या पोखरण तलाव बचाव मोहिमेत सहकुटूंब सहभागी झालेले दिसून आले. यामध्ये रोटरीच्या कल्याण डायमंडचे चार्टर प्रेसिडेंट बाळासाहेब एरंडे, कल्याण रोटरी क्लबचे अरुण सपकाळे, निशिगंधा वनसूत्रे, भुवनेश्वरन, वैभव ठाकरे, धारंगे आदी पदाधिकाऱ्यांसह पोखरण वास्तूचे विश्वस्त लेले, पिंपळखरेही सहभागी झाले होते. आता यानंतर तरी शासनाला या ऐतिहासिक – प्राचीन वास्तूच्या जतन आणि संवर्धनाविषयी जाग येते का हे लवकरच स्पष्ट होईल.
पोखरण तलावाचा असा आहे इतिहास…
जुनं कल्याण अशी ओळख असणाऱ्या कल्याण पश्चिमेच्या पारनाका परिसरात असणाऱ्या या पोखरण तलावाला साधारणपणे 250 ते 300 वर्षांचा इतिहास आहे. पेशव्यांच्या काळात सुभेदार बिवलकर यांच्याकडून बांधण्यात आलेली ही वास्तू म्हणजे वास्तुशास्त्र आणि स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजली जाते. त्याकाळी निर्माण झालेला या परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या पोखरण तलावाची निर्मिती करण्यात आली. कल्याणचे आणखीन एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असणाऱ्या काळा तलावमधील पाणी खापरी नाल्याच्या माध्यमातून पोखरण तलावात जमा व्हायचे असे दाखले सापडतात. या पोखरण तलावामुळे तत्कालीन पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण त्याचसोबत पाणी नसल्याने आटलेल्या विहिरींनाही पाणी आल्याने नवसंजीवनी मिळाली. मात्र काळाच्या ओघात या प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी अक्षम्य असे दुर्लक्ष झाले ज्याची फळं आज हा पोखरण तलाव भोगताना दिसतोय.