Home ठळक बातम्या तब्बल ३ हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा अवलिया

तब्बल ३ हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा अवलिया

अनोखा छंद जोपासत केली आजारावर मात

कल्याण दि.5 एप्रिल :
‘सर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासूनच प्रचलित आहे. मात्र कल्याणातील एका अवलियाच्या अनोख्या छंदामुळे ती बदलून ‘सर सलामत तो पगडी हजार’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अनंत नारायण जोशी असे या अवलियाचे नाव असून त्यांच्याकडे जगभरातील थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ३ हजारपेक्षा अधिक युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह आहे.

मोहेंजोदडो – हडप्पा काळापासून टोपी, पगडीचा वापर…
विभिन्न प्रांत, जाती, जमातींच्या विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात प्राचीन काळापासून म्हणजे मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीच्या काळापासून टोप्या किंवा पगडी वापरली जात असल्याचे दाखले सापडतात. तर साधारणपणे साडेतीन हजारांहून अधिक असे समाज, जाती, जमाती आहेत ज्या डोक्यावर टोपी, पगडी, रुमाल आदीसारख्या वस्तू वापरत असल्याचे अनंत जोशी यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.

जगभातील 30 देशांमधील विविध प्रकारच्या टोप्या, शिरस्त्राण संग्रही…
अनंत जोशी हे गेल्या 30 वर्षांपासून हा आपला अनोखा छंद जोपासत असून शिरोभूषण नावाच्या संग्रहालयात हा ठेवा जोपासला आहे. भारताचा विचार केल्यास इकडे सत्ता गाजवलेल्या मराठा, राजपूत, मुघल काळातील युद्धकालीन शिरस्त्राण, जिरेटोप आदींचां खजिना आहे. तर जगभरातील ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आदी देशांतील विविध टोप्या, पगड्या, युद्धकालीन जिरेटोप, शिरस्त्राण संग्रही आहेत. यातील सर्वात जुने म्हणजे 18 व्या शतकात अफाणिस्तानमध्ये धातूंपासून बनवलेले शिरस्त्राणही आपल्या संग्रही असल्याचे जोशी यांनी सांगितले. तर 2005 च्या महापुरात यातील सुमारे 200 टोप्या, पगडी, शिरस्त्राण पाण्यात भिजून खराब झाल्याने फेकून द्यावे लागल्याची दुःखद आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

 

या अनोख्या छंदाने आजारावर मात करण्याचे दिले बळ…
8 वर्षांचे असताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची काविळ झाली. ज्यामुळे आपण बिछान्यावर झोपूनच होतो. त्यावेळी टिव्ही हाच एकमेव आपल्याला आधार घेऊन. टिव्हीवर त्याकाळी येणाऱ्या रामायण आणि महाभारत या मालिका पाहूनच आपल्याला हा छंद जडला. आणि हळूहळू आपण टोपी, पगडी गोळा करण्यास सुरुवात केली. आणि या छंदामुळेच आपण आजारपणावर मात करून पुन्हा उभे राहू शकलो असे जोशी म्हणाले. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी छंद जोपासला पाहीजे. आपल्या कठीण काळात हाच छंद आपल्याला एक वेगळी ऊर्जा देतो, बळ देतो असे अनंत जोशी यांनी सांगितले.

लिम्का बुक, इंडिया बुक आणि गिनीज बुककडून दखल…
आपल्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुकने घेतली असून लिम्का बुकमध्ये गेल्या 20 वर्षांपासून तर इंडिया बुकमध्ये गेल्या 10 वर्षांपासून या आपल्या छंदाचा समावेश केला आहे. तर संपूर्ण जगभरात मानाचे स्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या गिनीज बुकनेही आपल्या कामाची दखल घेतली असल्याचे अनंत जोशी म्हणाले.

वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या, पगड्या, युद्धकालीन शिरस्त्राण जमा करण्यासह जोशी यांनी त्याचा खूप अभ्यासही केला आहे. डिपार्टमेंट ऑफ आर्कीओलॉजी त्यांच्या संशोधनाच्या पेपरचे वाचनही झाले आहे. अशा या अवलिया कलाकाराला एलएनएन टीमचा मानाचा मुजरा…

– केतन बेटावदकर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा