केडीएमसी अग्निशमन दलाचा उपक्रम
कल्याण दि. 19 एप्रिल :
बरोबर 79 वर्षांपूर्वी (१४ एप्रिल १९४४) मुंबई डॉक यार्डमध्ये जहाजाला लागलेल्या आगीशी झुंजताना अग्निशमन दलाच्या तब्बल ६६ जवानांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात अग्निशमन सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाच्या माध्यमांतून नागरिकांना आग लागू नये यासाठी घ्यायची काळजी, आग लागल्यानंतर करायच्या उपाय योजना आदींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातर्फेही कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी हा सप्ताह सुरू असून त्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
मुंबईतील त्या भीषण आगीत जीव गमावलेल्या अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ देशभरात 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा आठवडा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. इतर शहरांप्रमाणेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फेही शहराच्या वेगवेगळ्या भागात जनजागृतीनिमित्त प्रात्यक्षिके, मॉकड्रिल आदी उपक्रम या सप्ताहात राबवले जात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
या सप्ताहदरम्यान अग्निशमन विभागाकडून विविध सोसायटी आस्थापना, शाळा, कार्यालयामध्ये जाऊन संभाव्य धोके टाळण्यासाठी घ्यायची दक्षता आणि उपाय योजनांबाबत माहिती दिली जात आहे. त्यासोबतच केडीएमसी अग्निशमन दलाकडे असणाऱ्या सुसज्ज उपकरणे, वाहने आदींबाबतही लोकांना सांगितले जात असल्याच्या मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.
कल्याण डोबिवलीत याठिकाणी झाली प्रात्यक्षिके…
दरम्यान वेदांत हॉस्पीटल- गंधारी, क्रोमा – खडकपाडा, वायलेनगर, गुरुदेव एनएक्स, आयुष हॉस्पीटल, जीटी हॉस्पीटल, डी मार्ट खडकपाडा, बैलबाजार, गोदरेज हील, सहजानंद चौक, निमकर नाका, वाजपेयी चौक, गणपती मंदिर चौक, गोकुळ नगर, म्हसोबा चौक, बालाजी गार्डन, कोपर रोड, इंदिरा गांधी चौक, एक्सपेरीया मॉल, व्दारका हॉटेल, शास्त्रीनगर हॉस्पीटल आदी कल्याण डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयासमोर मॉकड्रीलही करण्यात आले.