Home ठळक बातम्या उष्णतेची लाट : कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात तापमान 42 पार

उष्णतेची लाट : कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात तापमान 42 पार

यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद

कल्याण डोंबिवली दि. 18 एप्रिल :

कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा काही केल्या खाली यायचे नाव घेत नाहीये. आज तर कमाल तापमानाने कमालच केली असून ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात तब्बल 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. अक्षरशः होरपळून टाकणारे हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उच्चांकी तापमान असल्याची महत्त्वाची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. (Heat wave: Thane district including Kalyan Dombivli records highest summer temperature this year at 42 celcius)

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यामध्ये सूर्य जणू काही आग ओकत आहे. त्यामुळेच तर अवघ्या काही दिवसांमध्ये तापमानाने 35 ते 42 अंश सेल्सिअसचा भयानक टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्यापासून तर इथले तापमान 40 आणि 40 अंशांपेक्षा अधिकच राहिल्याची माहिती अभिजित मोडक यांनी दिली.

आज तर उष्णतेने कहरच केला. कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये तब्बल 42 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. हे यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमान असून आता तर एप्रिलचा अर्धा महिना उलटला आहे. उद्याही अशीच परिस्थीती राहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात घट पाहायला मिळेल अशी माहिती मोडक यांनी दिली.

उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे आपल्याकडे ही भयानक परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवस असेच चित्र दिसेल असा अंदाज हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी वर्तवला आहे.

 

आज नोंद झालेले कमाल तापमान

मुंबई ३७.१° सेल्सियस
कल्याण ४२.८
डोंबिवली ४२.६
नवी मुंबई ४१.८
ठाणे ४२
पनवेल ४२.२
मुंब्रा ४२.३
बदलापूर ४२.६
कासारवडवली ४२.८
धसई ४३
मुरबाड ४४
कर्जत ४५
विरार ३८
मीरा रोड ३८.२

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा