Home ठळक बातम्या खबरदार…रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता महापालिका खेचणार थेट कोर्टात

खबरदार…रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता महापालिका खेचणार थेट कोर्टात

 

कल्याण / डोंबिवली दि.10 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासह अशा लोकांना थेट कोर्टात उभं केलं जाणार (Beware … Municipal Corporation will now take those who throw garbage on the road directly to the court) आहे. केडीएमसी प्रशासनाने याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून 15 नागरिकांवर अशाप्रकारे कारवाई झाली आहे. तर ओला-सुका कचरा वेगळा करूनही तो उचलण्यासाठी न येणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईची संतप्त मागणी नागरिकांनी केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून कचऱ्याच्या समस्येने कल्याण डोंबिवलीकर आणि महापालिकेला अक्षरशः छळले आहे. मात्र ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी झालेले प्रयत्न आणि नागरिकांनी त्याला दिलेल्या प्रतिसादामूळे गेल्या वर्षभरात डम्पिंगवरील भार कमी होण्यास मदत होत आहे. पालिकेने शहरात रस्त्यावर असणाऱ्या सर्व कचराकुंड्या हटवल्या असून घरोघरी जाऊन कचरा उचलण्यावर भर दिला आहे. प्रशासनाकडून एकीकडे कल्याण डोंबिवली शहरं कचरामुक्त करण्यासाठी केडीएमसी प्रशासन प्रयत्नशील असून रस्त्यावर कचरा न टाकण्याबाबत जनजागृतीही सुरू केली आहे. तरीही काही ठिकाणी नागरिकांकडून किंवा उपहारगृहांकडून रस्त्यावरच कचरा फेकला जात आहे. अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात आता केडीएमसी आणखी आक्रमक झाली असून पोलिसांच्या मदतीने पालिकेकडून एक नवी मोहिम सुरु करण्यात आली आहे.

त्यानूसार रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना थेट कोर्टात खेचण्याचा येणार आहे. प्रायोगिक तत्वावर मानपाडा परिसरात ही कारवाई सुरू झाली असून येत्या काळात संपूर्ण पालिकाक्षेत्रात ती राबवण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली. तसेच आतापर्यंत 15 जणांना अशाप्रकारे कारवाईला सामोरे जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान महापालिकेने सुरू केलेल्या या नव्या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून कचरा वेगळा करून तो उचलण्यासाठी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार ? असा संतप्त सवालही पालिकेला विचारला आहे. आम्ही तरी किती दिवस आमच्या घरात कचरा साचवून ठेवायचा? तो उचललाच जात नसेल तर आम्ही त्या कचऱ्याचे काय करायचे? असे अनेक प्रश्न नागरिकांनी पालिकेला विचारले आहेत. ज्याची उत्तरं आणि उपाय महापालिका प्रशासनाला येत्या काळात द्यावी लागतील. अन्यथा नागरिक आणि महापालिका संघर्ष अटळ आहे.

१ कॉमेंट

  1. सरिता आईस फॅक्टरीच्या बाजूलाच मोठमोठ्या पिशवीतून कचरा टाकत आहेत. तेथे खाजगी जागेत आता पत्रा शेड पुन्हा टाकून वर सुचना फलक चुकीच्या दिशेला तोंड करून लावला आहे. मानपाडा रोड वरून येऊन सायकल/स्कूटर वरून सर्रास कचरा टाकला जात आहे. डोंबिवलीत त्याच्या बाजूलाच मोठा स्फोट झाला होता. ते झालेले नुकसान कोणी विसरूच शकणार नाही. पण शासन विसरतात. नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा