कल्याण दि.१३ जून :
कल्याण शहराच्या काही भागात दुपारच्या सुमारास बरोबर १ मिनिटांसाठी पावसाने हजेरी लावली. त्यामूळे काहींनी आनंद व्यक्त केला असला तरी या क्षणभर पावसाने बाईकस्वारांच्या डोक्याला चांगलाच घाम फोडला. पावसाच्या शिंतोड्यामुळे विविध ठिकाणी रस्त्यावर बाईकस्वार घसरून पडल्याचे दिसून आले. (Bike riders fell down in the first rain)
गेल्या दोन महिन्यांपासून कल्याण डोंबिवली शहरांवर सूर्य जणू आग ओकत आहे. दिवस असो की रात्री दोन्ही वेळेला जाणवणाऱ्या अतिशय प्रचंड उकाड्याने नागरिक कमलीचे हैराण झाले आहेत. चातक पक्षाप्रमाणे किंवा त्याच्याहून अधिक आतुरतेने सर्वच जण सध्या वरुण राजाची वाट पाहत आहेत. येत्या दोन दिवसांत मान्सूनचे आपल्याकडे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून आज सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आज पाऊस पडेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती.
आणि त्याला अनुसरून आज दुपारी १ ते दिड वाजण्याच्या दरम्यान रिमझिम पावसाने कल्याणात हजेरी लावली. त्यामुळे सगळेच जण खुश झाले. मात्र त्यांचा हा आनंद अल्पायुषीच ठरला. पावसाने अवघ्या एका मिनिटासाठी रिमझिम बरसात करून नंतर शांतपणे पुढे निघून गेला.
मात्र एक मिनिटांच्या या पावसाने काहीही नाही तर रस्ते काहीसे ओले करण्याचे काम केलं. आणि त्या ओल्या रस्त्यांवरून गाडी चालवताना काही ठिकाणी बाईकस्वार घसरून पडले. विशेषतः सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर असे अपघात झाल्याचे आढळले. सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी अवघ्या १ मिनिटाच्या पावसाने या बाईक स्वारांच्या डोक्याला चांगलाच घाम फोडला.