Home ठळक बातम्या कल्याणच्या तिघा धावपटुंकडून जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण

कल्याणच्या तिघा धावपटुंकडून जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण

तिघा धावपटूंवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव

कल्याण दि. १३ जून :
जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत अवघड समजली जाणारी मॅरेथॉन म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन. धावपटुंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी ही मॅरेथॉन कल्याणातील धावपटूंनी यशस्वीरित्या पूर्ण करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

संजय काळुंखे , डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहबादपुरी अशी या तिघा कल्याणकर धावपटूंची नावे आहेत. जगातील अत्यंत अवघड मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ती यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून त्यांचा कसून सराव सुरू होता. सुप्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षक सतीश गूजराण यांच्या मार्गदर्शनाखाली या तिघा धावपटूंनी केलेली मेहनत फळाला आली.

इतकी कठीण आहे ही मॅरेथॉन…
आतापर्यंत आपण आपल्याकडील मुंबई मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉन, पुणे मॅरेथॉन अशा स्पर्धा बघितल्या आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनशी त्यांची तुलना केली तर आपल्याकडील या सर्व मॅरेथॉन म्हणजे अक्षरशः लहान मुलांचा खेळ वाटेल. यावरूनच कॉम्रेड मॅरेथॉनमधील आव्हानांचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर यात सहभागी होणाऱ्या धावपटूंनी ४२ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ४ तास आणि ५० मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण केली असेल तरच त्यांना या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये प्रवेश दिला जातो.

कॉम्रेड मॅरेथॉनचे अंतर तब्बल ९० किलोमीटर…
तर या मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंनी आपल्याकडील मॅरेथॉनच्या दुपटीहून अधिक म्हणजेच तब्बल ९० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. तेही १२ तासांच्या आतमध्ये आणि कुठेही न थांबता. तर २१ किलोमीटर, ४२ किमी आणि ६५ किमीचे अंतर हे आयोजकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच पार करण्याचे बंधन धावपटूंवर असते.

एकप्रकारे ही मॅरेथॉन म्हणजे धावपटूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी असते. इतकी कठीणप्राय मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल संजय काळुंखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहबादपुरी यांच्यावर कल्याण डोंबिवलीतील अनेक मान्यवरांकडून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कल्याणचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले – डॉ. प्रशांत पाटील
व्यावसायिक संजय काळुंखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहबादपुरी या तिघांनी ही कठीण मॅरेथॉन पूर्ण करत कल्याणचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच या तिघाही कल्याणकरांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच केडीएमसीचे सचिव संजय जाधव, सायकलपटू आणि केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही या तिघा धावपटूंचे विशेष कौतुक केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा