Home ठळक बातम्या युक्रेनमधून आमच्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणा – कल्याण डोंबिवलीतील पालकांची आर्त...

युक्रेनमधून आमच्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणा – कल्याण डोंबिवलीतील पालकांची आर्त साद

(फोटो सौजन्य : डेक्कन हेराल्ड डॉट कॉम)

केतन बेटावदकर

कल्याण – डोंबिवली दि.28 फेब्रुवारी :
रशिया – युक्रेन युद्धामूळे भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले असून त्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील 8 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यातच रशियाकडून अणूअस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने पालकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामूळे आमच्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणण्याची आर्त मागणी युक्रेनमध्ये अडकलेल्या कल्याण डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या कल्याण डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी एलएनएनने संपर्क साधला.

रशिया – युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेले हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक कमालीचे हवालदिल झाले आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 54 विद्यार्थ्यांचाही समावेश असून ठाणे शहरातून सर्वाधिक म्हणजेच 22 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर त्यापाठोपाठ नवी मुंबई 9, कल्याण 6, डोंबिवली 2, भिवंडी 7, मिरा भाईंदर 4 तर अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड आणि वाशिंद येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीतून युक्रेनमध्ये 8 विद्यार्थी गेले असून त्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या पालकांशी एलएनएनने संपर्क साधून या मुलांबाबत माहिती जाणून घेतली. हे 8 विद्यार्थी उझरोव्ह,भुको विनियन युनिव्हर्सिटी, खारकिव्ह, लविव्ह आणि क्रोप्रिव्हिन्स्कीमध्ये अडकून पडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. तर रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन जवळपास 5 दिवस झाले असून दिवसागणिक युक्रेनमधील परिस्थिती चिघळत चालली आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून या सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या विद्यापीठाच्या बंकरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्या पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर एलएनएनशी बोलताना दिली. तर काही ठिकाणी मुलांकडील खायचे सामान संपू लागले आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त एकवेळचे जेवण मिळत असल्याचेही या पालकांकडून सांगण्यात आले. मात्र युद्धाची दाहकता अजून वाढण्याआधीच आमच्या मुलांना परत भारतात आणण्याची आर्त मागणी या पालकांनी केली आहे.

तर एवढ्या मोठ्या संख्येने मुलं तिकडे शिकायला का जात आहेत याचा आपल्या सरकारने विचार करण्याची गरज एका पालकाने एलएनएनशी बोलताना व्यक्त केली. जर का आपल्या भारतातच या मुलांना कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण उपलब्ध झाल्यास आमच्या मुलांना तिकडे पाठवायची गरज पडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया एका मुलाच्या आईने बोलताना व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा