Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत प्रचारसभांचा धडाका ; रविवारी शरद पवार,सोमवारी उध्दव ठाकरे तर बुधवारी...

कल्याण डोंबिवलीत प्रचारसभांचा धडाका ; रविवारी शरद पवार,सोमवारी उध्दव ठाकरे तर बुधवारी नरेंद्र मोदींची सभा

महायुती आणि महविकास आघाडीची जय्यत तयारी

कल्याण डोंबिवली दि.11 मे :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्यापूर्वीच्या अखेरच्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांचा धुरळा उडणार आहे. (Campaign rallies in Kalyan Dombivli; Sharad Pawar on Sunday, Uddhav Thackeray on Monday and Narendra Modi on Wednesday)

या जाहीर प्रचारसभांच्या धडाक्याची सुरुवात उद्या 12 मे रोजी म्हणजेच रविवारपासून होत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार उद्या कल्याणात येत आहेत. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव क्रीडांगण येथे संध्याकाळी 6 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.

त्यापाठोपाठ सोमवारी म्हणजेच 13 मे रोजी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमूख नेते उध्दव ठाकरे यांची डोंबिवलीमध्ये जाहीर सभा होत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीतील भागशाळा मैदानात ही सभा होणार आहे.

तर उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या एक दिवसानंतर म्हणजेच बुधवारी 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिमेला जाहीर सभा होणार आहे. येथील आधारवाडी परिसरातील छ्त्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे.

सध्या महायुती आणि महविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप, शाब्दिक वार – पलटवार हे सध्या टोकाला जाऊन पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर या तिन्ही दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमुळे काळात कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरणही चांगलेच ढवळून निघेल यात काही शंका नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा