Home ठळक बातम्या 25 वर्षांच्या सत्तेनंतरही ‘ते’ चांगले रस्ते देऊ शकत नाहीत – अमित ठाकरेंची...

25 वर्षांच्या सत्तेनंतरही ‘ते’ चांगले रस्ते देऊ शकत नाहीत – अमित ठाकरेंची शिवसेनेवर टिका

 

कल्याण-डोंबिवली दि.2 ऑक्टोबर :
चांगले रस्ते बांधणे हे काही रॉकेट सायन्स नाही. मात्र सलग 25 वर्षे हातात सत्ता देऊनही चांगले रस्ते देऊ शकत नसल्याची टिका मनसेचे युवानेते अमित राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. अमित ठाकरे शुक्रवारपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असून खड्ड्यांमूळे त्यांनी लोकल प्रवास करून येणे आणि परत जाणे पसंत केले. त्याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता अप्रत्यक्ष टिका केली.

या लोकांकडून अपेक्षा ठेवून तुम्हाला काही मिळेल असे मला वाटत नाही. एखाद्या सामान्य माणसाकडे जरी 25 वर्षे सत्ता दिली असती तर त्याने शिकून स्वतःची एक चांगली टीम तयार केली असती आणि लोकांना चांगले रस्ते दिले असते. मग हे तर राजकारणात मुरलेले आहेत, त्यांनाही या गोष्टी कळत असणारच. त्यानंतरही 25 वर्षांत त्यांच्याकडून साधे चांगले रस्तेही दिले जात नसल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तर मनसेने नाशिकमध्ये हीच गोष्ट करून दाखवली आहे. साधारणपणे 7 ते 8 वर्षे झाली असतील रस्ते बनवून पण अद्याप एक खड्डा पडलेला नाहीये रस्त्यावर. तिकडे पाऊस पडत नाही का? मात्र जी राज ठाकरेंकडे इच्छाशक्ती आहे ती यांच्याकडे नसल्याचे सांगत अमित ठाकरे यांनी शिवसेनेला चांगलाच टोला हाणला.

दरम्यान काल अमित ठाकरे यांनी मनसेच्या कल्याण डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण भागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी चर्चा केली. आजही डोंबिवलीच्या सर्वेश हॉलमध्ये उर्वरित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, मनसे नेते नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह हर्षद पाटील, संदीप म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा