Home ठळक बातम्या उधळलेल्या रेड्याचा कल्याणात उच्छाद ; वाहनांचे नुकसान काही नागरीकही जखमी

उधळलेल्या रेड्याचा कल्याणात उच्छाद ; वाहनांचे नुकसान काही नागरीकही जखमी

चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर झाला जेरबंद

कल्याण दि.12 डिसेंबर :
कल्याण पश्चिमकरांसाठी आज मंगळवारची दुपार चांगलीच तापदायक ठरली. अचानकपणे उधळलेल्या रेड्याने जुने कल्याण अशी ओळख असणाऱ्या भागात चांगलाच उच्छाद मांडला. उधळलेल्या या रेड्याने अनेक वाहनांचे नुकसान करत काही पादचाऱ्यांनाही आपल्या धडकेत जखमी केले. ( Chaos in Kalyan by male buffalo’s; Vehicles were damaged and some civilians were also injured) Kalyan

कल्याण पश्चिमेच्या दुर्गाडी किल्ल्याजवळील गोविंदवाडी बायपास परिसरात म्हशीचे अनेक गोठे असून या गोठ्यातील एक रेडा अचानक उधळला गेला. नेमकं काय झालं आहे हे समजायच्या आता या रेड्याने आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक वाहन आणि नागरिकाला टार्गेट करण्यास सुरुवात केली. अक्षरशः पिसाळल्याप्रमाणे सुस्साट धावत निघालेल्या या रेड्याने समोर दिसणाऱ्या चारचाकी , बाईक यांना जोरदार धडकत त्यांचे नुकसान तर केलेच. पण त्याचसोबत रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनाही आपल्या ढुसण्यांनी घायाळ करून सोडले.

नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दूधनाका, पारनाका परिसरात आज दुपारी या मस्तवाल रेड्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडत मोठे नुकसान केले. त्यामुळे या भागामध्ये काही काळ अतिशय गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आधी पोलीस आणि मग त्यानंतर केडीएमसी आणि मग त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेचे फायर ब्रिगेडही घटनास्थळी दाखल झाले. परंतू उधळललेल्या या रेड्याला नेमका आवर कसा घालावा हेच कोणाला समजत नव्हते. तर गाड्यांना दिलेल्या धडकेत हा रेडाही जखमी झाला होता.

दरम्यान दुधनाका परिसरातील एका रहिवासी सोसायटीच्या आवारात हा रेडा शिरला आणि तेथेच त्याला डांबून ठेवून बाजारपेठ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तर काही तास उच्छाद घातल्यानंतर दमून आणि जखमी होऊन शांत झालेल्या या रेड्याला कसे बसे एका विजेच्या खांबाला बांधून ठेवण्यात यश आले. आणि त्यानंतर मग एका टेंपोमध्ये भरून त्याला उपचारासाठी पुढे नेण्यात आल्याने स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा