कल्याण दि.11 डिसेंबर :
झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे तब्बल 300 कोटीहून अधिक बेहिशेबी रोकड सापडली. या घटनेवरून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार उघड झाला असल्याचा हल्लाबोल कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. कल्याण पश्चिमेतील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्ष कल्याण पश्चिमच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले. (Unaccounted cash from JHARKHAND Congress MP; BJP’s AGITATION in KALYAN)
काँग्रेसचा एक खासदार 300 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह पकडला गेला तर इतर सर्व काँग्रेस खासदारांकडे किती रोख रक्कम असेल? त्यानुसार गांधी कुटुंब हे जगातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. काँग्रेसने आपल्या नेत्यांना भ्रष्टाचाराचे एटीएम बनवल्याचे सांगत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काँग्रेस पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झारखंडमधील या काँग्रेस खासदाराच्या घरी गेल्या 3 दिवसांपासून काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची रक्कम मोजण्याचे काम सुरू असून नोटा मोजणारे मशीन खराब झाले, मात्र यांची बेहिशोबी संपत्ती काही संपता संपेना असा घणाघातही नरेंद्र पवार यांनी यावेळी केला.
दरम्यान छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनामध्ये कल्याण शहर मंडल अध्यक्ष वरुण पाटील, मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, कल्याण जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस प्रिती दिक्षित, भावना मनराजा, कल्याण शहर महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली पाटील, कल्याण जिल्हा सचिव रमेश कोनकर, संतोष शिंगोळे, नवनाथ पाटील, ज्योती भोईर, शशिकांत पाटील, शत्रुघ्न भोईर, बाबा सिंह, स्नेहल सोपारकर, हेमंत गायकवाड, दशरथ पाटील, सुचित्रा होळकर, संगिता जाधव, जयश्री पवार यांच्यासह कल्याण पश्चिम विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.