Home ठळक बातम्या पाहा मतदानाची अंतिम आकडेवारी: कल्याण आणि भिवंडी लोकसभेमध्ये झालेय इतके टक्के मतदान

पाहा मतदानाची अंतिम आकडेवारी: कल्याण आणि भिवंडी लोकसभेमध्ये झालेय इतके टक्के मतदान

केडीएमसी क्षेत्रात मतदानाने प्रथमच ओलांडली पन्नाशी

वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात ?

कल्याण – भिवंडी दि.22 मे :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी अखेर प्राप्त झाली आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाले असून कल्याण लोकसभेत 50.12 टक्के ते भिवंडी लोकसभेत 59.89 टक्के इतके मतदान झाले आहे. हा वाढीव मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडला आहे यावरून आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.(Loksabha elections, Check Final Polling Statistics: Kalyan and Bhiwandi Lok Sabha Polling Percentage)

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ हे महाराष्ट्रातील प्रमूख मतदारसंघांपैकी एक. कल्याण लोकसभेमध्ये सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उध्दव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर तर भिवंडी लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडणुक लढवणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे उभे ठाकले आहेत. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले ते 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक झालेले मतदान.

2014 आणि 2019 मध्ये कल्याण – भिवंडीत इतके मतदान…
दहा वर्षापूर्वी म्हणजेच 2014 मध्ये कल्याण लोकसभेत सर्वात कमी म्हणजेच केवळ 42.94 टक्के इतके अत्यल्प मतदान झाले होते. तर त्याच्या पुढच्या निवडणूकीत म्हणजेच 2019 मध्ये त्यात काही अंशी वाढ होऊन 45.19 टक्के इतक्या मात्र तरीही कमीच मतदानाची नोंद झाली होती. या दोन्ही निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी झालेले 50.12 टक्के मतदान हे समाधानकारक म्हणावे लागेल.

तर भिवंडी लोकसभेत 2014 मध्ये 53.06 टक्के तर 2019 मध्ये त्यापेक्षा कमी म्हणजेच 51.62 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत किती मतदान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यंदाच्या निवडणूकीत तब्बल 60 टक्क्यांपर्यंत (59.89) मतदान झाले आहे, हे विशेष.

कल्याण डोंबिवलीने ओलांडली मतदानाची पन्नाशी…
यंदाच्या या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आणि ते म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेली वाढ. केडीएमसी क्षेत्रात निवडणुक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जन जागृतीपर अभियान राबवण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 52.98 टक्के, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात 52.19 टक्के, डोंबिवली विधानसभा मतदारसंघात 51.67 टक्के आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 51.01 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील या चार मतदारसंघांनी मतदानाची पन्नाशी ओलांडल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये युवा आणि नव मतदारांची संख्या ही सर्वाधिक असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या नव मतदारांनी इतरांच्या तुलनेत मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यामध्ये कोणतीच कसूर सोडली नाही. त्यामुळेच या नव मतदारांचे मतदान हे नक्कीच गेमचेंजर ठरेल असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

तर यापेक्षा आणखी मतदान झाले असते…
कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने एकच गोंधळ उडाला. मतदानाला आलेल्या मोठ्या संख्येच्या मतदारांची नावे यादीतून गायब असल्याचा प्रकार समोर आला. आणि यामुळेच कल्याण – भिवंडी लोकसभेतील वाढीव मतदानाला सुरुंग लागला. एकीकडे गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली असली तरी मतदार यादीतून नावे गायब झाली नसती तर या दोन्ही ठिकाणी निश्चितपणे आणखी 5 ते 10 टक्के वाढीव मतदान झाले असते असा अंदाज राजकीय जाणकारांनी एलएनएनशी बोलताना व्यक्त केला आहे. मात्र आता अवघ्या काही महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक आली असून त्या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिकांनी लवकरात लवकर आपली नावे मतदार यादीत करून घ्यावी. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही.

भिवंडीत झालेले विधानसभानिहाय मतदान…(59.89टक्के)

 • भिवंडी ग्रामीण – 72.66 टक्के
 • भिवंडी पश्चिम – 55.17
 • भिवंडी पूर्व – 49.87
 • कल्याण वेस्ट – 52.98
 • मुरबाड – 61.12
 • शहापूर – 70.26

कल्याण लोकसभेतील विधानसभानिहाय मतदान…(50.12 टक्के)

 • अंबरनाथ – 47.07 टक्के
 • उल्हासनगर – 51.10
 • कल्याण पूर्व – 52.19
 • डोंबिवली – 51.67
 • कल्याण ग्रामीण – 51.01
 • मुंब्रा कळवा – 48.72

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या या वाढीव मतदानाचा नेमका कोणाला आणि कसा फायदा होणार आहे हे 4 जून रोजीच स्पष्ट होईल. तोपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा