Home ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या बुधवारी कल्याणात ; प्रबोधनकार ठाकरे तलावासह विविध विकासकामांचे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या बुधवारी कल्याणात ; प्रबोधनकार ठाकरे तलावासह विविध विकासकामांचे लोकार्पण

कल्याण दि.१३ फेब्रुवारी :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या बुधवारी कल्याण दौऱ्यावर येत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेने सुशोभीकरण केलेल्या प्रबोधनकार ठाकरे (शेणाळे) तलावासह विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Chief Minister Eknath Shinde in Kalyan next Wednesday; Inauguration of various development works including Prabodhankar Thackeray Lake)

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत कल्याण पश्चिम येथील काळा तलाव अर्थातच प्रबोधनकार ठाकरे सरोवराचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी फूड कोर्ट, कॅफेटेरियासोबतच तरंगते आणि रंगीबेरंगी म्युझिकल कारंजे हे या सुशोभीकरणाचे ठळक वैशिष्ट्य आहे. यासोबतच तलावाचे सौंदर्य पाहता यावे म्हणून याठिकाणी एक अष्टकोनी जेटी बांधण्यात आली आहे.

यासोबतच अमृत अभियानांतर्गत वाडेघर आणि आंबिवली येथे उभारण्यात आलेल्या मलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यान्वित केले जाणार आहेत. तर बीएसयुपी अंतर्गत बांधण्यात आलेल्या सदनिकांचे लाभार्थ्यांना वाटपही मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. तर महापालिका परिवहन सेवेच्या 48 कंत्राटी वाहक आणि अकरा कंत्राटी चालकांना परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवर घेतले जाण्याचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे.

या विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण कल्याणात येत असल्याचे आयुक्त डॉक्टर दांगडे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा