Home ठळक बातम्या देशाच्या वेगवान प्रगतीमध्ये ब्राह्मण समाजानेही योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या वेगवान प्रगतीमध्ये ब्राह्मण समाजानेही योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीतील ब्राह्मण बिझनेस नेटवर्क कार्यक्रमाला उपस्थिती

डोंबिवली दि. १३ फेब्रुवारी :
यापूर्वी समाजाला जे जे आवश्यक होते ते देण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले असून आज आपला देश ज्या वेगाने पुढे जात आहे. त्यामध्ये ब्राह्मण समाजाने योगदान देण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत व्यक्त केले. डोंबिवलीच्या माता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित ब्राह्मण बिझनेस नेटवर्क संस्थेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाकडून वर्षानुवर्षे समाजाला दिशा देण्याचे काम…

ब्राह्मण समाजाने वर्षानुवर्षे समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. तसेच ज्यावेळी हाती तलवार घेऊन लढायची गरज होती त्यावेळी लढण्याचे काम केले. तर ज्यावेळी समाज सुधारणेच्या वेळी समाजसुधारकांनी आपल्या समाजाच्या लोकांविरोधातही उभे राहून समाज सुधारणेचे कार्य केले असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नवउद्योजकांच्या पाठीशी एक संघटना म्हणून उभे राहणे आवश्यक…

आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश अतिशय वेगाने प्रगती करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. २०३० पर्यंत जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपली वाटचाल सुरू असून त्यासाठी व्यावसायिकता आणि व्यावसायिक दृष्टिकोन महत्वाची भूमिका बजावणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आयटी आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज व्यवसायाच्या अनेक नवनविन संधी निर्माण झाल्या असून या नव्या जगाची मूल्ये समजून घ्यावी लागतील. ती समजून घेण्यात आपली तरुणाई मोठ्या प्रमाणात काम करत असून या सर्व नवउद्योजकांच्या पाठीशी एक संघटना म्हणून उभे राहणे आवश्यक असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीबीएन (ब्राह्मण बिझनेस नेटवर्क) हाच संदेश देत असल्याचे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

ब्राह्मण समाजाने कधीच काही मागितलं नाही…

ब्राह्मण समाजाच्या अनेक कार्यक्रमांना आपण उपस्थित राहिलो आहोत. मात्र या समाजाने कधीच काही मागितलं नाही. स्वयंभू असलेला समाज उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मागणं काही वाईट नसतं, राज्यकर्त्यांकडे मागितल पाहिजे. मात्र आम्ही तुमच्याकडे काही मागणार नाही. आम्ही आमच्या बळावर सर्व प्राप्त करू हा आत्मविश्वास त्यापेक्षाही महत्त्वाचा असल्याचे सांगत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली.

दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या बीबीएन परिषदेमध्ये देशभरातील शेकडो यशस्वी उद्योजक आणि नव उद्योजक सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा