Home ठळक बातम्या अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण डोंबिवलीतील सीएनजी पंप आजपासून 3 दिवस बंद

अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण डोंबिवलीतील सीएनजी पंप आजपासून 3 दिवस बंद

गेलकडून अंबरनाथ येथील मुख्य गॅस वाहिनीच्या मेंटेनन्सचे काम

कल्याण डोंबिवली दि.7 मार्च :
तुम्ही आपल्या गाडीमध्ये जर सीएनजी भरून घ्यायच्या विचारात असाल तर मग जरा थांबा. कारण तुम्हाला सीएनजी भरून घेण्यासाठी थोडा जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. महानगर गॅसच्या अंबरनाथ येथील सीएनजी पंपाच्या मुख्य गॅस वाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. परिणामी अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण डोंबिवलीतील सी एन जी पंप आजपासून पुढील 3 दिवस बंद राहणार असल्याची माहिती महानगर गॅसतर्फे देण्यात आली आहे. (CNG pumps in Ambernath, Ulhasnagar and Kalyan Dombivli closed for 3 days from today)

गेल (GAIL) म्हणजेच गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाकडून अंबरनाथ येथील सिटीगेट स्टेशन पंपाला गॅस पुरवठा करणाऱ्या मुख्य गॅस वाहिनीचे तातडीने देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. पुढील 3 दिवस म्हणजेच 7 मार्चपासून ते 9 मार्चपर्यंत हे देखभाल दुरुस्तीचे काम चालणार असल्याचे महानगर गॅसने आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

या देखभाल दुरूस्ती कामामुळे या गॅस वाहिनीवरील गॅस पुरवठा बंद राहणार असून इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल स्वरूपाच्या ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचेही महानगर गॅसने या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

महानगर गॅसच्या या तातडीच्या देखभाल दुरूस्ती कामामुळे अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण आणि डोंबिवली परिसरातील ऑनलाईन सी एन जी पंपही बंद राहणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या ग्राहक प्रतिनिधी केंद्राकडून देण्यात आली आहे.

दरम्यान सी एन जी पंप बंद राहणार असल्याची माहिती वाहन चालकांमध्ये काल रात्री अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली आणि गॅस भरून घेण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील सी एन जी पंपावर गाड्यांची मोठी रांग लागली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा