Home क्राइम वॉच नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट बटरची विक्री ; क्राईम ब्रँचकडून कारखान्यावर छापा

नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट बटरची विक्री ; क्राईम ब्रँचकडून कारखान्यावर छापा

डोंबिवली दि.6 मार्च :
तुम्ही जर का हॉटेलमध्ये, धाब्यावर किंवा हातगाडीवर आवडीने बटर (लोणी) मध्ये बनवलेले पदार्थ खात असाल तर मग जरा थांबा. कारण नामांकित कंपन्यांच्या नावाने अतिशय घाणेरडे असे बनावट बटर (लोणी) तयार करण्याचा प्रकार डोंबिवलीजवळील खोणी गावात समोर आला आहे.

डोंबिवलीजवळ काटई – बदलापूर मार्गावर असलेल्या खोणी गावामधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बनावट बटर बनवले जात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्याआधारे क्राईम ब्रँचच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. आणि समोर दिसलेल्या दृश्याने त्यांनाही अक्षरशः किळस वाटली. या कारखान्यात अत्यंत वाईट आणि घाणेरड्या पद्धतीने बनावट बटर बनवून ते नामांकित कंपन्यांच्या नावाने विकले जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण या कारखान्यात अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाचे बॉक्सही पोलिसांना आढळून आले आहेत. हे बनावट बटर, ते बनवण्याकरता लागणारे साहित्य, मशीन, कच्चा माल आणि नामांकित कंपनीचे बॉक्स क्राईम ब्रँचने जप्त केले आहेत. तर याप्रकरणी क्राईम ब्रँचने पिंटू यादव आणि प्रेमचंद फेकुराम या दोघांना अटक करत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के, पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, पोलीस कर्मचारी दत्ताराम भोसले, गुरुनाथ जरग, अनुप कामत यांच्या पथकाने केली आहे.

दरम्यान यापुढे हॉटेल, धाब्यावर किंवा हातगाडीवर बटरमध्ये बनवलेले पदार्थ खात असाल तर सावधगिरी बाळगा अन्यथा त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा