Home क्राइम वॉच वाद विकोपाला : शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांचा गोळीबार

वाद विकोपाला : शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांचा गोळीबार

गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी

उल्हासनगर दि.3 फेब्रुवारी :
कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. या गोळीबारात मध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील रात्रीपासूनच ज्युपीटर रूग्णालयात उपस्थित आहेत. तर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वाद सुरू आहे. त्यातच जमिनीच्या एका जुन्या प्रकरणात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड दोघे आले होते. मात्र या चर्चेचे रूपांतर आधी बाचाबाचीमध्ये होऊन नंतर गोळीबार होण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर काल रात्रीपासून कल्याण पुर्वेमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना सुरुवातील उल्हासनगरमधील मिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही वेळाने ठाण्यातील ज्युपीटर रूग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

आपण स्वसंरक्षणासाठी हा गोळीबार केला – आमदार गणपत गायकवाड
“पोलिस स्टेशनमध्ये आपल्या मुलाला धक्काबुक्की झाली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला गेला असून माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर स्वसंरक्षणार्थ आपण गोळीबार केल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी झी 24 तास या वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले. तसेच गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

लोकप्रतिनिधीने केलेले कृत्य हे घृणास्पद – जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,
महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले असून तातडीने ऑपरेशन द्वारे या गोळ्या काढण्यात आल्या आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधी आणि आमदाराने असे कृत्य करणे हे घृणास्पद आहे. त्याचा आम्ही निषेध करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच स्वतः गुन्हा करायचा आणि मुख्यमंत्र्यांसारख्या उच्च पदस्थ व्यक्तीला दोष द्यायचा याचाही आम्ही निषेध करत असल्याचे गोपाळ लांडगे म्हणाले.

जमिनीच्या वादातून हा प्रकार – दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त
संबंधित जमिनीवर एकाने कंपाऊंड टाकले आणि दुसऱ्याने ते काढले. यावरून पोलीस ठाण्यात दोघांसमवेत समझोता बैठक सुरू होती. मात्र त्यादरम्यान वाद निर्माण झाला आणि त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी प्रसिध्दीमाध्यमांना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा