Home ठळक बातम्या जपानच्या मियावाकी पद्धतीचे वृक्षारोपण : केडीएमसीकडून बारावे घनकचरा प्रकल्पामध्ये प्रयोग

जपानच्या मियावाकी पद्धतीचे वृक्षारोपण : केडीएमसीकडून बारावे घनकचरा प्रकल्पामध्ये प्रयोग

दिड एकरावर फुलवणार 5 हजार झाडांचे जंगल

कल्याण दि.2 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवली परिसरात हरित पट्टे बनवण्याच्या उद्देशाने केडीएमसी प्रशासनाने अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. आज असलेल्या जागतिक पाणथळ भुमी दिनाचे (World Wetlands Day) औचित्य साधून कल्याणच्या बारावे घनकचरा प्रकल्‍प परिसरात जपानच्या मियावाकी पध्दतीने वृक्षरोपणाचा प्रयोग राबवण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कॅच फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जात असलेल्या या प्रकल्पामध्ये सुमारे १.५ एकर जागेवर जपानच्या अनोख्या मियावाकी पध्दतीने तब्बल ५ हजार झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये बकुळ, कडुलिंब, अर्जुन, कदंब, जांभुळ, पिंपळ या देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे. कॅव्हेस्ट्रो इंडिया प्रा.लि.च्या सीएसआर फंडामधून कॅच फाऊंडेशन या 5 हजार वृक्षांची पुढील ३ वर्षे देखभाल आणि निगा राखली जाणार आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत या वृक्षारोपण उपक्रमाला सुरुवात करण्यात आला.

यासमयी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त प्रसाद बोरकर, धैर्यशील जाधव, मुख्य उद्यान अधिक्षक व विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅन्ड ॲम्बेसेडर रुपींदर कौर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

काय आहे जपानची मियावाकी पद्धत..?
जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा.अकिरा मियावाकी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे, या पद्धतीमध्ये प्रत्येक चौरस मीटरमध्ये दोन ते चार वेगवेगळ्या प्रकारची देशी झाडे लावली जातात . 1970 च्या दशकात ही कार्यपद्धती विकसित करण्यात आली होती, ज्याचा मूळ उद्देश जमिनीच्या छोट्याशा भागामध्ये घनदाट झाडांची लागवड करणे होते. या तंत्रज्ञानात निसर्गाबरोबरच विज्ञानही आढळते म्हणूनच प्रा. मियावाकी म्हणतात की ‘ही निसर्ग आणि विज्ञानाची शुद्ध मैत्री आहे’. वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे. येथे विदेशी वृक्षांना स्थान नसते. सर्व तंत्रज्ञान जमिनीखालील उपयोगी जिवाणू, खेळती हवा, शेणखत आणि भाताच्या तुसावर अवलंबून असते. मियावाकीस योग्य कुंपण घालून पहिली दोन वर्षे सांभाळल्यास तिसऱ्या वर्षी ही उद्याने स्वतंत्र आणि स्थिर होतात.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा