Home ठळक बातम्या एसी लोकलचे भाडे कमी करून साधारण लोकलच्या फेऱ्या वाढवा – खासदार डॉ....

एसी लोकलचे भाडे कमी करून साधारण लोकलच्या फेऱ्या वाढवा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रेल्वे संबंधित मागण्यांकडे वेधले सभागृहाचे लक्ष

नवी दिल्ली दि. 16 मार्च :

मध्य रेल्वेवर नुकत्याच कार्यान्वित झालेल्या 5 व्या 6व्या मार्गावरील एसी लोकलचे भाडे कमी करून या मार्गावर एसीऐवजी साधारण लोकलच्या जास्तीत जास्त फेऱ्या वाढवण्याची महत्वपूर्ण मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रेल्वे संबंधित चर्चेत सहभाग घेत खासदार डॉ. शिंदे यांनी या मागणीसह उपनरीय रेल्वेसेवा आणि प्रवाशांच्या मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

नुकत्याच कार्यान्वित झालेल्या 5व्या 6व्या रेल्वे मार्गावर सामान्य लोकलसह एसी लोकलही चालविण्यात येत आहेत. मात्र या एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वसाधारण लोकलमधील प्रवाशांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून कमी आहे. एसी लोकलचे भाडे सेकंड क्लासच्या १० पट आणि फस्ट क्लासच्या दुपट्टीहून अधिक आहे. जे प्रवाशांना परवडणारे नसून या एसी लोकलचा दैनंदिन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना काहीच फायदा होत नाहीये. आणि या एसी लोकलमुळे रेल्वेवरही खर्चाचा मोठा भार पडत आहे. त्यामुळे या एसी लोकलचे भाडे कमी करून या मार्गावर साधारण लोकलच्या जास्तीत जास्त फेऱ्या वाढवण्याची महत्वपूर्ण मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत असलेल्या या 5व्या 6व्या रेल्वे मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढवण्याचे कामही लवकरात लवकर सुरु करण्याची मागणीही त्यांनी केली.

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईसह देशभरातील रेल्वे जमिनींवर अनधिकृतपणे राहत असलेल्या लाखो नागरिकांना रेल्वे प्रशासनाने जमिनी तातडीने रिक्त करण्याच्या नोटीसा धाडल्या. गेली ४० ते ५० वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ या जमिनीवर राहणाऱ्या लोकांचे पुर्नवसन न करता त्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये या मागणीसाठी नुकतीच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची एमएमआर रिजनमधील खासदार – आमदारांनी भेट घेतली. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार, रेल्वे प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रितपणे योजना राबवून या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. परंतू दोन दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून या रहिवाशांना पुन्हा नोटीसा पाठवण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी निदर्शनास आणत रहिवाशांच्या पुर्नवसनाचा प्रश्न सुटेपर्यंत कुठलीही कारवाई न करण्याची मागणी त्यांनी रेल्वेमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली.

रेल्वे प्रश्नांसंदर्भात खा.डॉ. शिंदे यांनी मांडलेले विविध मुद्दे…

अधिक काळ रखडलेल्या पनवेल – कर्जत मार्गाचे काम लवकर सुरु करावे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मंजूर झालेल्या आणि २०१९ मध्ये भूमिपूजन झालेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरु असून या कामाला गती देत स्थानकाचे काम लवकर पूर्ण करावे.

गेली अनेक वर्षे रखडलेल्या कळवा – ऐेरोली उन्नत मार्ग प्रकल्पात येत असलेल्या जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया लांबली जात आहे. तसेच डिएफसीसी कॉरिडॉर प्रकल्पही कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरु असून या प्रकल्पामध्ये ज्याप्रमाणे नागरिकांना इतरत्र जागा देण्याऐवजी पैश्यांमध्ये मोबदला देण्यात आला तोच पर्याय कळवा – ऐेरोली उन्नत मार्ग आणि इतर प्रकल्पांमध्ये वापरल्यास प्रकल्पासाठीचे जमिन अधिग्रहण लवकर पूर्ण होऊन प्रकल्पांचे काम देखील मार्गी लागेल.

दिवा – वसई मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात यावी, जेणेकरुन या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.

कल्याण ते बदलापूर पट्ट्यात 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकांसाठी जमिन अधिग्रहणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन या रेल्वे मार्गिकांच्या कामाला गती द्यावी.

कोकण रेल्वे मार्गावरील जास्तीत जास्त गाड्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा रेल्वे स्थानकात थांबा द्यावा जेणेकरुन मोठ्या संख्येने दिवा विभागात राहत असलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावाला जाण्यासाठी सातत्याने मुंबईला जावे लागणार नाही.

सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या रेल्वे मार्गिकांची २०१४ साली घोषणा झाली होती. परंतू अद्यापही या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहणाचे काम खुपच संथ गतीने सुरु असून हे काम गतीने पूर्ण करत सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या रेल्वे मार्गिकांच्या प्रत्यक्ष कामाला देखील लवकरात लवकर सुरुवात करावी. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. शारदीय तसेच चैत्रातील नवरात्रौत्सव काळात महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी आईचे दर्शन घेण्यासाठी ८ ते १० लाख भाविक तुळजापूरला भेट देत असतात आणि हा मार्ग झाल्यास या भाविकांना मोठा दिलासा मिळेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा