Home ठळक बातम्या बीएएनआरएफअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करून अवॉर्ड लेटर देण्याची मागणी

बीएएनआरएफअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करून अवॉर्ड लेटर देण्याची मागणी

मुंबई दि.२३ मार्च :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आधीछात्रवृत्ति (BANRF – 2021) अंतर्गत पात्र 861 विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशिप मंजूर करण्यासह निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ अवॉर्ड लेटर देण्याची मागणी ब्लॅक पँथर पक्षातर्फे करण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थी कृती समितीतर्फे गेल्या ३२ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू असून याप्रश्नी ब्लॅक पँथरतर्फे मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

ब्लॅक पँथर (पक्ष) ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय म. कांबळे, कल्याण तालुका सचिव छाया मांजरेकर आणि कल्याण शहर उपाध्यक्ष कैलाश गायकवाड आदींनी या आंदोलक विद्यार्थ्यांची आज भेट घेत या विद्यार्थ्यांना आपला पाठींबा जाहीर केला.

अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा…
गेल्या ३२ दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले असून राज्य सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे ब्लॅक पँथरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय कांबळे यांनी सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून जातिभेद आणि दुटप्पी धोरण सोडून संविधानिक न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे सांगत सध्या सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी ब्लॅक पँथरतर्फे या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जाणीवपूर्वक पक्षपात केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास ब्लॅक पँथरतर्फे याविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेणार…

तसेच या विषयासंदर्भात ब्लॅक पँथरचे एक शिष्टमंडळ २४ मार्च रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या सभागृहात मांडण्याचे निवेदन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अजय कांबळे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा