कल्याण दि.11 मार्च :
कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोरोना आपले हातपाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण कोर्टातील जज, वकील आणि कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने कोवीड लस देण्याची मागणी कल्याण दिवाणी वकील संघटनेतर्फे करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
कल्याण कोर्टात सुरू असणाऱ्या खटल्यांशी संबंधित अनेक व्यक्ती दररोज कोर्ट आणि त्याच्या आवारात येत असतात. बऱ्याचदा तर कोर्ट हॉलमध्ये जाण्यासाठी मोठ्या गर्दीतून वाट काढत जावे लागते. कल्याणात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं असून अशा परिस्थितीत कोर्ट परिसरात होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कल्याण कोर्टातील जज, वकील आणि कोर्टातील कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने कोवीड लस देण्याची मागणी कल्याण दिवाणी वकील संघटनेने केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही कोर्टामध्ये होणाऱ्या गर्दीबाबत चिंता व्यक्त करत कल्याण दिवाणी वकील संघटनेच्या मागणीबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी कल्याण दिवाणी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.सतीश अत्रे, खजिनदार ऍड. नरेंद्र बोन्द्रे, सहखजिनदार ऍड.जयदीप हजारे यांच्यासह ऍड.राजू भोईर आणि ऍड.सुशांत म्हात्रे हे सदस्य उपस्थित होते.