Home ठळक बातम्या कल्याणच्या रिंगरोडवर बाइकर्सची धुमस्टाईल स्टंटबाजी ; कारवाईची नागरिकांची मागणी

कल्याणच्या रिंगरोडवर बाइकर्सची धुमस्टाईल स्टंटबाजी ; कारवाईची नागरिकांची मागणी

कल्याण दि.18 एप्रिल :
कल्याणचा नव्याने बनलेला रिंगरोड बाईकर्सच्या धुम स्टाईल स्टंटबाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. गेल्या आठवड्यातील मध्यरात्रीच्या सुमारासचे धूमस्टाईल स्टंटबाजीचे काही व्हिडिओ समोर आले असून अशा वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कल्याणहून टिटवाळ्याला काही मिनिटांत जाण्यासाठी हा रिंगरोड बांधण्यात येत असून कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात तो बहुतांशी पूर्ण झाला आहे. दोन्हीकडून दुपदरी बांधणी आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणांमुळे हा रस्ता अल्पावधीतच कल्याणकरांच्या मोठ्या पसंतीस उतरला आहे. हजारो नागरिक सकाळ – संध्याकाळी याठिकाणी हमखास फिरण्यासाठी येत असतात. ही या रस्त्याची चांगली बाजू असली तरी गेल्या काही महिन्यांमध्ये याठिकाणी बेदरकार (रॅश ड्रायव्हींग) वाहन चालकांमुळे अनेक अपघात घडले असून त्यात काहींनी आपला जीवही गमावला आहे. परिणामी या रस्त्याची एक बाजू सुरू तर दुसरी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मात्र याचा बेदरकार (रॅश ड्रायव्हींग) वाहन चालकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेच समोर आलेल्या या धुमस्टाईल बाइकर्सच्या नव्या व्हिडीओवरून दिसून येत आहे. हा गेल्या आठवड्यातील व्हिडिओ असून त्यामध्ये या महागड्या बाईक धुम स्टाईल चालविण्यासह हे बाइकर्स अतिशय धोकादायक स्टंट करत असल्याचेही दिसत आहे. याआधीही रिंगरोडवर बाइकर्सचे झालेले जीवघेणे अपघात पाहता बाइकर्सच्या या स्टंटमुळे इथे फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी दुर्घटना घडून कोणाच्या जीवावर बेतण्यापूर्वी या धुमस्टाईल बाइकर्स आणि त्यांच्या स्टंटबाजीला आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा