Home ठळक बातम्या ‘मेरे घर राम आये है ‘; कल्याण पूर्व – पश्चिमेत दुमदुमला श्रीराम...

‘मेरे घर राम आये है ‘; कल्याण पूर्व – पश्चिमेत दुमदुमला श्रीराम नामाचा गजर

श्रीरामनवमी निमित्त निघालेल्या स्वागतयात्रेत हजारोंचा सहभाग

कल्याण दि.18 एप्रिल :

एकीकडे काही महिन्यांपूर्वीच अयोध्या नगरीतील भव्य मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाल्याने संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पसरले आहे. ज्याचे प्रतिबिंब कालच्या श्रीराम नवमीनिमित्ताने कल्याण पूर्व आणि पश्चिमेत निघालेल्या विविध शोभायात्रांमध्ये पाहायला मिळाले. अयोध्येमध्ये तब्बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यानंतर असणारी ही पहिलीच श्रीराम नवमी होती. त्यामुळे रामभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. (‘Mere Ghar Ram Aye Hai’; Shriram Nama Gajar in Kalyan East – West)

श्रीराम नवमीनिमित्त काल कल्याण डोंबिवलीतील विविध श्रीराम मंदिरांत मोठा उत्साह दिसून येत होता. तर काही ठिकाणी श्रीराम जन्माचा अतिशय सुदंर आणि भावोत्कट सोहळाही साजरा करण्यात आला. त्यासोबतच कल्याणमध्ये काल कल्याण पूर्वेतील 90 फुटी रोड, पत्रीपुलाजवळील कचोरे गाव आणि कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकासह विविध ठिकाणी श्रीराम नवमीनिमित्त सकल हिंदू समाजातर्फे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भव्य अशा शोभायात्रा काढण्यात आल्या.

कल्याण पूर्वेतील 90 फुटी रोड परिसरात सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून, कचोरे येथे श्रीराम सेवा मंडळाच्या आणि कल्याण पश्चिमेत सहजीवन सेवा मंडळाच्या माध्यमातून श्रीराम नवमी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ल्यावरील देवीची यथोचित आरती झाल्यावर हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत दुर्गाडी चौकातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. ज्यामध्ये कल्याणातील अनेक मान्यवर नागरिक, सामाजिक संस्था, अध्यात्मिक मंडळे आणि शेकडो हिंदू बांधव, महिला भगिनी आणि आबालवृद्ध पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ एकच प्रभू श्रीरामाचा जयघोष दिसत होता.

दरम्यान या शोभायात्रेत हिंदु संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले असून जिथे तिथे जय श्रीराम, जय श्रीराम हा एकच नारा ऐकायला येत होता. आजपर्यंतची कल्याणातील श्रीराम नवमीची ही सर्वात मोठी भव्य शोभायात्रा ठरली. ज्यामध्ये अनेक हिंदु संघटना, विविध समाज आणि घटकांचे चित्ररथ साकारले होते. या विविध ठिकाणच्या शोभायात्रेमध्ये केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , माजी आमदार नरेंद्र पवार, सहजीवन सेवा मंडळाचे अध्यक्ष आयोजक मधुकर फडके, भाजप कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, बजरंग दल कल्याण जिल्हा सह संयोजक राजन चौधरी, रेखा चौधरी, आतिश चौधरी यांच्यासह विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यात्रेत कल्याणमधील सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाने सहभाग घेतला होता.

म्हणून ही श्रीराम नवमी आपल्या सर्वांसाठी विशेष – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
अयोध्येत 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर बनले आणि त्यामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच श्रीरामनवमी आहे. पूर्वी अयोध्यामध्ये आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन एका छोट्याशा झोपडीमध्ये घेत होतो. पण हे पहिलं वर्ष आहे की प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य मंदिर आज त्याठिकाणी उभे राहिले आहे. म्हणून प्रत्येकासाठी ही श्रीराम नवमी विशेष असल्याचे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रामभक्तांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा