Home ठळक बातम्या डोंबिवली एमआयडीसी रिॲक्टर स्फोट : 4 ठार तर 33 जण जखमी

डोंबिवली एमआयडीसी रिॲक्टर स्फोट : 4 ठार तर 33 जण जखमी

शेजारील कंपन्यांसह दुकाने आणि रहिवसी इमारतींचे मोठे नुकसान

अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर हलवणार – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली दि.23 मे :
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 4 जण ठार तर 33 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणाहून अग्निशमन दलाने चार जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे. तर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.(Dombivli MIDC reactor explosion: 4 killed and 33 injured)

हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या 8 ते 10 कंपन्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यातील काही कामगारही जखमी झाले आहेत. कंपनीपासून जवळच असलेल्या कल्याण शीळ रोडवरील शोरूम्स,सोनारपाडा आणि सागाव येथील अनेक फ्लॅट्स, घरे आणि दुकानांच्या काचाही फुटल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेपर्यंत सुमारे पाच किलोमीटरच्या परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. स्फोट नेमका कशाचा झाला?, हे काहीवेळ कुणालाच कळले नाही. भूकंप झाल्याची अफवा पसरली आणि जिवाच्या आकांताने लोक घर आणि इमारतींमधून उतरून पळू लागले. कंपनीपासून जवळ असलेल्या मानपाडा रोडवर तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या, 12 पाण्याचे टँकर, 8 ते 10 ॲम्ब्युलन्स तसेच पोलीसही दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. जखमींना डोंबिवलीतील एम्स आणि नेपच्यून रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. स्फोटात जखमी झालेल्या 24 जणांना एम्स रुग्णालयात तर 9 जण नेपच्यून रुग्णालयात दाखल आहेत. स्फोटानंतर डोंबिवली पूर्व भागात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले.

आजचा स्फोट हा साधारणपणे एक ते दीड किलोमीटर… अंतरापर्यंत ऐकू आला. तर त्यापेक्षा लांब दूरवरून या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे – धुराचे लोळ आकाशात उठल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्यामध्ये आतापर्यंत आगीमध्ये जळालेल्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तर केडीएमसी अग्निशमन दलासोबतच एनडीआरएफची एक टीम आणि औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर हलवणार, एक आठवड्याच्या आत नुकसानभरपाई मिळणार – खा.डॉ. श्रीकांत शिंदे …

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना खा.डॉ. शिंदे यांनी सांगितले की डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याची मागणी याआधी झालेल्या अशाच प्रकारच्या घटनांनंतर केली जात आहे. त्यावर आता राज्य शासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल. इथल्या केमिकल कंपन्यांचे एबीसी असे वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्यात याव्यात. मात्र या कंपन्या स्थलांतरित करताना कोणाच्याही नोकरीवर गदा येणार नाही याचा नक्कीच विचार केला जाईल असेही खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून यातील नुकसानग्रस्तांचे एक आठवड्याच्या आत पंचनामे करण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्यधिकाऱ्यांना दिले असून त्यानंतर तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल असेही खा.डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.

आज झालेल्या या स्फोटाने 2016 मध्ये याच ठिकाणी झालेल्या प्रोबेस स्फोटाची आठवण  झाली. प्रोबेस दुर्घटनेत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा