Home ठळक बातम्या “भर पंखातून स्वप्न उद्याचे, झेप घे रे पाखरा” : प्रतिकूल परिस्थितीतही यांनी...

“भर पंखातून स्वप्न उद्याचे, झेप घे रे पाखरा” : प्रतिकूल परिस्थितीतही यांनी दहावीत मिळवले घवघवीत यश

कल्याण दि.28 मे :
आपल्या समाजामध्ये दोन परस्परविरोधी कौटुंबिक परिस्थिती पाहायला मिळतात. एका ठिकाणी पालकांकडून आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी सर्व काही दिले जाते, तर दुसरीकडे बरोबर याच्याविरोधात चित्र आढळून येते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही ही मुलं हार न मानता जिद्दीने आपल्या स्वप्नांना साकारण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. जाणून घेऊ या कल्याणातील अशा काही जिद्दी विद्यार्थ्यांबद्दल. (“Dream of the future with full wings, leap forward”: despite adverse conditions, achieved great success in 10th standard.)

महेर सरवार चौहान – कोणताही क्लास न लावता दहावीत मिळवले 90.20 टक्के

कल्याणातील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या महेरचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल. महेरने कोणताही क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडी आणि शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने दहावी परीक्षेत तब्बल 90.20 टक्के गुण मिळवले आहेत. महेरच्या वडिलांचा कल्याण पश्चिमेत छोटासा गादी (MATRESS) कारखाना असून त्याद्वारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर तिची आई सलमा ही गृहिणी असून या दोघांनीही महेरला शिक्षणासाठी नेहमीच पाठींबा दिला आहे.

“मोठं झाल्यावर आपल्याला डॉक्टर व्हायचे असून त्यासाठी आपण सायन्समध्ये प्रवेश घेणार असल्याचे महेरने सांगितले. तर अभ्यासात आपल्याला काही अडचण आल्यास आपण ऑनलाईन माध्यमांतून त्याचे उत्तर शोधले. मात्र बहुतांशी अभ्यास आपण शाळेतूनच केल्याचे सांगत नसरीन आणि शिवा टीचर या दोघांनी आपल्याला खूप चांगले सहकार्य केल्याचे महेरने एल एन एन शी बोलताना सांगितले.”

कल्याणच्या या आदिवासी पाड्यावरही आनंदोत्सव…
आज एकीकडे कल्याणची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना आजही याठिकाणी अशीही काही गाव पाडे आहेत,जिकडे आताशी कुठे शिक्षणाचा प्रसार होऊ लागला आहे. यापैकी एक असणारे कल्याण पश्चिमेच्या उंबर्डे येथील पाणबुडे नगर नावाचा आदिवासी पाडा. कालचा दिवस या आदिवासी वस्तीसाठी दसरा आणि दिवाळीपेक्षा कमी महत्त्वाचा नव्हता. कारण या पाड्यावर राहणाऱ्यांपैकी तिघा मुलांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

कल्याणातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दशकभरापासून अनुबंध संस्था कार्यरत आहे. या संस्थेने कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा वेचक कुटुंबांतील मुलांसोबतच आदिवासी पाड्यांवरील मुलांनाही शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचलला आहे. अनुबंध संस्थेच्या याच प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे.
पाणबुडे नगर या आदिवासी वस्तीतील तनिषा वाघे, संदीप वाघे आणि रणवीर वाघे या तिघा विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत. अनुबंध संस्थेच्या प्रमुख मीनल सोहनी मॅडम, सूर्यकांत कोळी आणि प्रभाकर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिघे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

छोटासा गादी कारखाना असलेल्या कुटुंबातील महेर असो की या आदिवासी पाड्यावरील तनिषा,संदीप, रणवीर हे तिघे असो. या सर्वांनी दाखवून दिलं आहे की मनामध्ये पुढे जायची जिद्द असेल तर कितीही कठीण परिस्थिती असली तरी ती तुमच्यापुढे हात टेकणारच. या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एलएनएनकडून आभाळभर शुभेच्छा.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा