एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनीविरोधात गुन्हा दाखल
कल्याण २७ डिसेंबर :
कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरात वाहनतळाची (पे अँड पार्क) इमारत बांधणाऱ्या ठेकेदाराने तब्बल ३४ लाख १६ हजार ९६० रुपयांची वीजचोरी महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली आहे. तसेच याप्रकरणी एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनी आणि पर्यवेक्षक फौज सिंग यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात असणाऱ्या कल्याण कोर्टासमोर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पे अँड पार्कींगच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. महावितरणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक शाखेचे सहायक अभियंता मोहम्मद शेख, दक्षता आणि अंमलबजावणी विभागाचे रामचंद्र मासाळे यांच्या पथकाने १९ डिसेंबरला या बांधकामाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली होती. त्यामध्ये बांधकामाच्या कामासाठी फिडर पीलरमधून थेट वीजवापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
तसेच अधिक तपासणीत या कंपनीने जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मीटर न घेता तब्बल ८४ हजार ३७२ युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३४ लाख १६ हजार ९६० रुपयांचे चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस कंपनीला बजावण्यात आली होती. परंतू विहीत मुदतीत हे पैसे न भरल्याने महावितरणचे सहायक अभियंता मोहम्मद शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी ही कंपनी आणि त्याचे पर्यवेक्षक सिंग यांच्याविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. या प्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक सागर चव्हाण पुढील तपास करत आहेत.