Home कोरोना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच ‘डॉक्टर आर्मी’ची स्थापना – आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ....

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच ‘डॉक्टर आर्मी’ची स्थापना – आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील

 

शिवजयंती उत्सवानिमित समाजातील मान्यवरांचा गौरव

कल्याण दि.23 मार्च :
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. त्याचाच आदर्श घेऊन कोवीड काळात कल्याण डोंबिवलीत ‘डॉक्टर आर्मी’ची स्थापना केल्याचे मत इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त शिवसेना पारनाका विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेना पारनाका विभागातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. काल झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गझलकार कवी प्रशांत वैद्य, राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी नेत्रा प्रसाद फडके, आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय पारितोषिक प्राप्त मधुरा संदीप लिमये, युवा कला गौरव पुरस्कारप्राप्त प्रयोगशील चित्रकार सारंग केळकर, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक सुनिता देसाई, केडीएमसीच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ओवी महाजन यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपशहर प्रमूख आणि आयोजक दिनेश शेटे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ‘डॉक्टर आर्मी’…

छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक मावळा घडवून ज्या पद्धतीने शून्यातून स्वराज्य स्थापन केले. त्याच संकल्पनेतून कोवीडविरोधात लढण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी एकत्र येत डॉक्टर आर्मीची स्थापना केली. एका डॉक्टरपासून सुरूवात झालेल्या या प्रवासात तब्बल 250 खासगी डॉक्टरांची फौज तयार झाली. ज्यांनी कल्याण डोंबिवलीतील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून हजारो कोवीड रुग्णांना आरोग्य सुविधा दिली. आणि त्याचाच परिणाम म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेला केंद्र सरकारचा राष्ट्रीय स्तरावरील कोवीड इनोव्हेशन पुरस्कारही प्राप्त झाल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी सांगितले. या उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळ हरदास यांच्या हस्ते डॉ. प्रशांत पाटील यांना गौरविण्यात आले.

तर यानंतर सादर झालेल्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळ हरदास, उपशहर प्रमुख आणि आयोजक दिनेश शेटे, अनंत हलवाईचे प्रफुल्ल गवळी, स्कायलॅबचे बाळासाहेब पानसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

काय आहे डॉक्टर आर्मी..?
तोकड्या शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून कोवीडला कसे तोंड द्यायचे ? या चिंतेत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन पडले होते. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांना मदतीचे आवाहन केले. त्याला इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण – डोंबिवलीने लगेचच सकारात्मक प्रतिसाद देत केडीएमसी आरोग्य यंत्रणेच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अगदी मोजक्याच डॉक्टरांच्या साथीने सुरू झालेल्या या साखळीमध्ये बघता बघता 250 डॉक्टर सहभागी झाले. तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्या एकत्र बैठकीत डॉक्टरांच्या या गटाचे ‘डॉक्टर आर्मी’ असे नामकरण करण्यात आले. आणि या डॉक्टर आर्मीनेही आपल्या प्राणाची पर्वा न करता अक्षरशः जीवाची बाजी लावून हजारो रुग्णांना कोवीडमधून बाहेर काढले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा