Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतही सकाळपासून पसरलेय धुरके; हवेची गुणवत्ता खालावली

कल्याण डोंबिवलीतही सकाळपासून पसरलेय धुरके; हवेची गुणवत्ता खालावली

 

कल्याण – डोंबिवली दि.23 जानेवारी :
मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात धुरके ( धुके आणि धूळ) पसरले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झाल्याने इथल्या हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याचे दिसत आहे. तर या खराब हवामानाचा परिणाम दम्याचे रुग्ण तसेच लहान मुलांवर होण्याची शक्यता तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

मुंबई, ठाण्यासह कल्याण डोंबिवलीतील वातावरणा बदल झाल्याचे सकाळपासून  पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र धुरकट धुरकट झाले आहे. या विचित्र वातावरणाचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही झाला आहे. हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याचे कल्याण डोंबिवलीत प्रदूषण महामंडळाने बसवलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स बोर्डद्वारे दिसत आहे. साहजिकच या खराब वातावरणाचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता तज्ञ डॉक्टरांनी वर्तवली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात कमालीची घट होत आहे. त्यात आता या आजच्या विचित्र हवामानाचीही भर पडली आहे.

“दमा असणाऱ्या व्यक्तींसाठी हे वातावरण अत्यंत खराब – डॉ. अभिजित ठाकूर”
अशा खराब वातावरणामूळे श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्ती, दम्याचे रुग्ण वाढण्याची भिती आहे. तसेच या वातावरणाचा परिणाम सर्दी, ऍलर्जीक खोकला येऊन तापही येऊ शकतो. असा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यासह मास्क लावण्यासारखी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. अभिजित ठाकूर यांनी व्यक्त केले.

“दिवसा अधिक आणि रात्री कमी तापमानाचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम – डॉ. गुरुदत्त भट”

सध्याचे वातावरण म्हणजे दिवसा अधिक आणि रात्री तेवढेच कमी असे विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे. ज्याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांमध्ये सर्दी, घशाचे आणि खोकल्यासारखे आजार होण्याचा धोका संभवतो. तर दमा असणाऱ्या मुलांना प्रदूषणामुळे अधिक त्रास होण्याचीही शक्यता आहे. मात्र पालकांनी भिती न बाळगता लहान मुलांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी. तर उद्यापासून शाळा सुरू होत असून या पार्श्वभूमीवर पालकांनीही आपल्या मुलांना सर्व गोष्टी समजावून शाळेत पाठवण्याचे आवाहनही डॉ. गुरुदत्त भट यांनी केले आहे.

 

“खराब हवामानाचा रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम – डॉ. प्रशांत पाटील, अध्यक्ष – आयएमए,कल्याण”

खराब हवामानामूळे आपल्या रोग प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. त्यामुळे मास्कचा वापर केवळ कोवीडपासूनच नव्हे प्रदूषण आणि बदलत्या हवामानापासूनही आपल्याला सुरक्षित ठेवतो. म्हणून नागरिकांनी वाहन चालवताना किंवा बाहेर फिरताना मास्कचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे मत इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा