Home ठळक बातम्या आजी – आजोबा दिवसाच्या निमित्ताने कल्याणात एकत्र आल्या चार पिढ्या

आजी – आजोबा दिवसाच्या निमित्ताने कल्याणात एकत्र आल्या चार पिढ्या

बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेचा उपक्रम

कल्याण दि.8 ऑक्टोबर :
आपल्याकडे आजी आजोबा आणि नातवंडांचे नाते म्हणजे दुधावरची साय असे वर्णन करण्यात आले आहे. मात्र बदलत्या काळात लुप्त होणाऱ्या एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारा सुदंर कार्यक्रम कल्याणात संपन्न झाला. निमित्त होते ते आजी आजोबा दिवसाचे ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार पिढ्या आनंदाने सहभागी झाल्या होत्या. (Four generations gathered in Kalyan on the occasion of Grandparents Day)

दरवर्षीप्रमाणे यंदाही बालक मंदिर संस्था कल्याण, प्राथमिक शाळेने आजी -आजोबा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. ‘एकत्र कुटुंब पद्धत’ ही भारतीय संस्कृतीची ओळख आणि पाया मानला जातो. पण काळाच्या ओघामध्ये एकत्र कुटुंब पद्धत हळूहळू लुप्त होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील पालकांच्या चार पिढ्या एकत्र आल्या होत्या.

आपल्या नातवंडांवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे आजी- आजोबा. लहान मुलांमध्ये मुल होऊन खेळणारे, त्यांची काळजी घेणारे, नातवंडांच्या स्पर्शाची भाषा समजणारे म्हणजे आमचे आजी-आजोबा. अशा या पाकात मुरलेल्या लोणच्यासारख्या आजी-आजोबांसाठी काहीतरी खास करावे म्हणून विविध कार्यक्रम घेतले गेले.

त्यात गीतगायन, कीर्तन, गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, तबला वादन, कथाकथन, सामुहिक नृत्य, भजन, गवळण अशा कार्यक्रमांचा समावेश होता. ज्यामध्ये वामन चिराटे यांनी सादर केलेल्या किर्तनात सर्वजण तल्लीन झाले होते. सर्व आजी -आजोबांनी या उपक्रमांत मनापासून भाग घेऊन आनंद लुटल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमासाठी मधुकर फडके आणि मंजिरी फडके हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा मोरे यांनी तर पाहूण्यांची ओळख भालचंद्र घाटे यांनी करून दिली. मुख्याध्यापिका कल्पना पवार यांनी प्रास्ताविक, दिपाली पाटील यांनी आभार मानले आणि रेखा महिंद्रकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रम समाप्त झाला.

संस्थेचे पदाधिकारी अनिल कुलकर्णी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा