Home ठळक बातम्या अतिधोकादायक इमारती: सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथक नियुक्त

अतिधोकादायक इमारती: सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथक नियुक्त

कल्याण डोंबिवली दि.11 ऑक्टोबर:
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दोन धोकादायक इमारती आणि इमारतीचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले असून अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यासंदर्भात लेखी आदेश दिले आहेत. (Hazardous buildings: Special team appointed by KDMC for survey)

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शेकडो धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती आहेत. यापैकी काही इमारती या रिकाम्या असून काही ठिकाणी अनेक जण आजही भितीच्या छायेत वास्तव्य करत आहेत. डोंबिवलतील काही दिवसांपूर्वी लागोपाठ दोन धोकादायक इमारती कोसळून अपघात झाले होते. हे अपघात लक्षात घेता केडीएमसी आयुक्त डॉ. दांगडे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे विशेष पथक स्थापन केले आहे.

विशेष पथकात या अधिकाऱ्यांचा समावेश…
जुन्या/अतिधोकादायक इमारती कोसळुन होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार आता महापालिकेच्या सर्व प्रभागात बांधकाम उपअभियंता, नगररचना विभाग सर्व्हेअर, मालमत्ता विभाग भागलिपिक आणि अग्निशमन विभाग स्थानक/उपस्थानक अधिकारी यांचा अंतर्भाव या विशेष पथकामध्ये असणार आहेत.

हे पथक असे करणार काम…
महापालिका परिक्षेत्रातील इमारती प्रथमदर्शनी अतिधोकादायक आहेत किंवा नाहीत हे निश्चित करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक प्रभागनिहाय, संबंधित प्रभागातील अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करुन हे पथक अहवाल सादर करणार आहेत. पथकाने तात्काळ कामकाजास सुरुवात करुन आपला एकत्रित अहवाल मुख्यालयात सादर करण्याचे आदेशही महापालिका अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत.

दररोज संध्याकाळी देणार अहवाल…
या पथकाने दैनंदिन कामकाजाचा अहवाल त्याचदिवशी निदर्शनास आलेल्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीसह संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना रोज सायंकाळी पाठवायचा आहे. संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी पथकाकडून माहिती प्राप्त होताच नियमातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा