Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवलीतील उत्सव आणि कल्याण महोत्सवाला दिली भेट

कल्याण दि.26 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीतील ज्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी अनेक कामे सुरु आहेत. काही कामे राहिली असतील तर त्यासाठी कोणत्याही प्रकारे आम्ही निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातर्फे आयोजित आपला कल्याण महोत्सवाला काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थितांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. (Funds will not fall short for development works in Kalyan Dombivli to go down – Chief Minister Eknath Shinde)

कार्यकर्ता म्हणूनच आपण काम करत राहणार…
कल्याण महोत्सवांसारख्या कार्यक्रमांतून सगळेच एकत्र येतात, या महोत्सवाचा आनंद लुटता येतो. या फेस्टिवलच्या माध्यमातून आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा वेळ का होईना आनंदाचे क्षण आपल्या जीवनामध्ये येत असतात. आपला महाराष्ट्र हा संस्कृती, सण, परंपरा, उत्सव जोपासणारा महाराष्ट्र आहे. आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर दीड वर्षांपूर्वी आम्ही सगळे सण उत्सवांचे निर्बंध काढून टाकले. यानंतर या महाराष्ट्रामध्ये थांबलेले लोकहिताचे अनेक प्रकल्प आम्ही सुरू केले, चालना दिली. लोकहिताचे अनेक चांगले निर्णय आपल्या सरकारने घेतले. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे अगदी गोरगरीब जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस झाले पाहिजे त्यांचे जीवन सुखकर झाले पाहिजे ही भावना आपल्या सरकारची आहे. मी तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून आज मुख्यमंत्री झालेलो आहे. आणि मी कालही कार्यकर्ता होतो, आजही करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार. कारण अन्यायाविरुद्ध लढणे आणि अन्याय दूर करणं हे बाळासाहेबांनी, आनंद दिघेंनी शिकवलं आहे. त्यांचेच विचार घेऊन आपण सरकार स्थापन केल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

कल्याण लोकसभेची आपल्याला चिंता नाही…

कल्याण लोकसभेची आपल्याला अजिबात चिंता नाही. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने एक चांगला खासदार तुम्हाला लाभलेला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक प्रकल्प झाले असून काही प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत,भविष्यातदेखील याठिकाणी अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. आता मला खरं म्हणजे ठाणे जिल्हा नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरायचं. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री बनवून काम करायचं आहे. मी जमिनीवरचा माणूस आहे. आज आपण मुंबईमध्ये स्वच्छतेला महत्व दिले आपण सुरू केलेले काम हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला राबवायचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

केडीएमसी आयुक्तांनाही केल्या सूचना…
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतली जी काही कामे झाली असतील, काही राहिली असतील, वाहतूक कोंडीच्या दृष्टीनेदेखील आपण लक्ष द्या, त्यासाठी आपल्याला काय निधी पाहिजे तो आम्ही उपलब्ध करून देऊ. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला सांगितले आहे की वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआर रिजनमध्ये महत्त्वाकांक्षी बायपास प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. अशाप्रकारचे अंतर्गत रस्ते झाले पाहिजेत, रिंगरोडचं काम सुरू असून कल्याण डोंबिवलीसाठी कुठेही निधी कमी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा