Home ठळक बातम्या सरकारची सकारात्मक भूमिका : 27 गाव संघर्ष समितीने मानले मुख्यमंत्री आणि खासदार...

सरकारची सकारात्मक भूमिका : 27 गाव संघर्ष समितीने मानले मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांचे आभार

 

डोंबिवली दि.३ मे :
२७ गावांतील विविध प्रश्न सोडवण्याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यामध्ये त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल २७ गाव संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीत एक पत्रकार परिषद घेत बैठकीची माहिती देत सरकारच्या कार्यवाही समाधान व्यक्त केले.

२७ गावांतील कर आकारणी, बांधकामे, स्वतंत्र नगरपालिका, कल्याण शीळ मार्गाच्या रुंदीकरणात बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणे आदी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे होते. याच प्रश्नांवर गेल्या आठवड्यात संघर्ष समितीने केडीएमसी मुख्यालयावर मोठा मोर्चा काढत महापालिका प्रशासन तसेच सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला होता.

यावेळी युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर खासदार शिंदे यांनी एक आठवड्याच्या आत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व प्रश्नांवर बैठक लावण्यात येईल असे संघर्ष समितीला आश्वस्त केले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 27 गावातील प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली. त्यामध्ये अनेक वर्ष प्रलंबित असणारे विविध प्रश्न निकाली निघाले. इतक्या वर्षात जे झाले नव्हते ते अपेक्षित निर्णय या बैठकीत झाल्याने आम्ही सर्वजण समाधानी असल्याची प्रतिक्रिया संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी व्यक्त केली.

तर आमचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत श्री सावळाराम महाराज यांच्या यांचे यथोचित आणि भव्य स्मारक बांधण्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती या पत्रकार परिषदेत चेतन महाराज यांनी दिली. त्यासोबतच कल्याण शील रस्त्याला ही संत श्री सावळाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केल्याने समस्त वारकरी समुदायाने आनंद व्यक्त केल्याचे चेतन महाराज म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 27 गाव संघर्ष समितीच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहेत. त्यामुळे येत्या काळात इथल्या भागात प्रलंबित असणाऱ्या विविध समस्या लवकरच सोडवल्या जातील असा विश्वास यावेळी युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला गंगाराम शेलार, अध्यक्ष संघष समिती, गजानन पाटील, युवा अध्यक्ष,
सरचिटणीस गजानन मांगरूळकर, रंगनाथ ठाकूर, चिटणीस, विजय भाने, विजय पाटील,  सावळाराम महाराज स्मारक समिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, खा. शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत दरेकर यांच्यासह संघर्ष समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा