Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात नववर्ष स्वागतयात्रांचा मोठा उत्साह

कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात नववर्ष स्वागतयात्रांचा मोठा उत्साह

 

कल्याण – डोंबिवली दि. २ एप्रिल :
जागोजागी रस्त्यावर काढण्यात आलेल्या सुबक रांगोळ्या… सोबतीला काही ठिकाणी सनई चौघडे तर काही ठिकाणी ढोल ताशांचा गजर…अशा आल्हाददायक वातावरणात नव्या वर्षाचा सळसळता उत्साह आज कल्याण डोंबिवीतील पाहायाला मिळाला. गुढीपाडव्यानिमित्त कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांनी एक सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य निर्माण झालेले पाहायला मिळाले. तर २ दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोवीडचे सर्व निर्बंध मागे घेतल्याने यात्रेमध्ये सहभागी झालेले नागरिक आणखीनच आनंदी झालेले दिसून आले.

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून खंड पडल्याने सर्वत्र गुढी पाडव्याला निघणाऱ्या यात्रांना ब्रेक लागला होता. त्यामुळे या काळात निर्माण झालेले अत्यंत नकारात्मक असे चित्र आणि वातावरण या स्वागत यात्रांमूळे पुसून निघालेले पाहायला मिळाले. कोरोनापूर्वी काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रांप्रमाणे देखावे आणि चित्ररथांचा समावेश नसला तरी आजच्या या स्वागतयात्रांमधील साधेपणाची मोठी शक्ती प्रकर्षाने दिसून आली.

कल्याण पश्चिमेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे, कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आणि डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे या स्वागतयात्रा काढण्यात आल्या. पालखी, कीर्तनाचा गजर, ढोल ताशा आणि विठूनामाचा गजर या यात्रांमध्ये पाहायला मिळाल्या.

या स्वागत यात्रांच्या मार्गावर स्वागतासाठी ठिकठिकाणी सुबक अशा रांगोळ्या, फुलांचा वर्षाव आणि ढोल ताशे सज्ज ठेवण्यात आले होते. तर या स्वागत यात्रांमध्ये फेटे घालून आणि नऊवारी साड्या नेसून बाईकवर स्वार झालेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा